हातातील हात
रात्रीचे अकरा वाजले होते. खिडकीबाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या, पण त्या कडाडण्याच्या आवाजापेक्षा जास्त मोठं वादळ तन्वीच्या मनात उठलं होतं. तिच्या हातात मोबाईल होता, स्क्रीनवर शेवटचा आलेला मेसेज दिसत होता –
"सॉरी तन्वी, पण मी पुढे जाऊ शकत नाही. हे आपल्यासाठीच योग्य आहे. काळजी घे."
हा मेसेज गौरवचा होता. तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला गौरव. ज्याच्यासोबत तन्वीने हजारो स्वप्नं पाहिली होती. त्या एका मेसेजनं ती स्वप्नं अक्षरशः चुरगाळून टाकली.
तीचं डोकं सुन्न झालं होतं. हा निर्णय एकट्या गौरवने घेतला होता. तिला काहीच सांगितलं नव्हतं. कोणतंही कारण नाही, कोणताही इशारा नाही. एकाएकी असं काय घडलं? एवढं प्रेम, एवढं विश्वासाचं नातं होतं… मग असं का?
तीन वर्षांपूर्वी...
तन्वी आणि गौरव एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत होते. दोघं एकाच ग्रुपमध्ये होते. सुरुवातीला मैत्री होती, हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. गौरवनेच तिला पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली होती.
"तन्वी, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. तुला कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात पाहायचंय."
त्या रात्री गौरवचा हात हातात धरून तन्वीनेही ‘हो’ म्हटलं होतं. दोघंही स्वप्नांच्या जगात होते. प्रेमाचे नवीन रंग उमटत होते.
गौरव तिच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असायचा. तिच्या आनंदात, दुःखात, प्रत्येक क्षणी तो तिला सांभाळायचा. दोघं मिळून अनेक ठिकाणी फिरले, आठवणी तयार केल्या.
"आपण कायम एकत्र राहू ना?" – तन्वीने कित्येकदा विचारलेला प्रश्न.
"अगं, हा काय प्रश्न आहे? मी तुला कधीच सोडणार नाही." – गौरवचा ठाम विश्वास.
आज काय झालं?
त्या दिवशी सकाळी सर्व काही नेहमीसारखंच होतं. दोघांनी सकाळी फोनवर बोलणं केलं होतं. अगदी सहज! काहीही वेगळं जाणवलं नव्हतं. पण संध्याकाळी अचानक तो मेसेज…
तन्वीने कित्येकदा कॉल केला, पण गौरवने उचललाच नाही. व्हॉट्सअॅपवर मेसेज ‘सीन’ झाला, पण रिप्लाय आला नाही.
दुसऱ्या दिवशी ती त्याच्या घरी गेली. पण तिथेही तो नव्हता. आई-वडिलांशी बोलायचं धाडस तिला झालं नाही. ती त्याच्या जवळच्या मित्रांना भेटली.
सत्य समोर आलं...
गौरव दुसऱ्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मागच्या काही महिन्यांपासून तो तन्वीपासून लपूनछपून एका नवीन मुलीच्या जवळ जात होता. हळूहळू जुनं नातं मागे टाकत नवीन नात्यात रमला होता.
जेव्हा हे कळलं, तेव्हा तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरवने तीच्याशी एकदाही स्पष्ट बोलायचं ठरवलं नाही. न सांगता, न भेटता, फक्त एक कोरडा मेसेज करून निघून गेला.
ती मनात विचार करत होती – "काही बोलायचं तरी नव्हतं का? निदान कारण तरी द्यायला हवं होतं…?"
असं किती जणांचं होतं? जेव्हा एक माणूस कोणालाही काहीही न सांगता निघून जातो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला एका अमर वेदनेच्या प्रवासावर टाकतो.
आजच्या काळात लोक नाती सहज जोडतात आणि तितक्याच सहज तोडतात. पण एकमेकांच्या भावनांचं काय? त्यांना काय वाटेल, याचा विचार कोण करतो?
गौरवसाठी तन्वी फक्त एक 'फेज' होती. पण तन्वीसाठी ते नातं तिचं पूर्ण आयुष्य होतं.
तन्वीचा निर्णय –
ती अनेक दिवस तसाच विचार करत राहिली. सुरुवातीचे काही महिने तिच्यासाठी अतोनात वेदनेचे होते.
पण मग ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागली – "माझं चुकलं तरी काय?"
उत्तर एकच होतं – "काहीही नाही!"
गौरव गेला, पण तन्वी तिथेच अडकून राहिली तर? तिने स्वतःला बाहेर काढण्याचं ठरवलं. स्वतःसाठी जगायचं ठरवलं
त्या रात्री पाऊस थांबला. पण तन्वीच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. पण ती आता कमजोर नव्हती.
गौरवने तिला न सांगता सोडून दिलं होतं, पण आता तिला स्वतःसाठी नव्याने उभं राहायचं होतं.
जेव्हा कोणी आपल्याला न सांगता सोडून जातं, तेव्हा आपण स्वतःला दोष देणं बंद करायला हवं. त्याऐवजी स्वतःला अधिक मजबूत करून पुढे जावं.
"हात सोडणारे अनेक भेटतील, पण स्वतःचा हात धरून उभं राहणं हेच खरं सामर्थ्य असतं!"
Comments
Post a Comment