लग्न न करणं हा पर्याय आहे…

“लग्न न करणं हा पर्याय आहे…
पण लग्न टाळत राहणं ही येणाऱ्या काळाची गंभीर चूक ठरू शकते.”
आजची पिढी खूप विचार करते.
ती लगेच निर्णय घेत नाही
हे चांगलं आहे.
पण अलीकडे एक वेगळीच गोष्ट दिसतेय
विचार इतका वाढलाय की निर्णयच होत नाही.
लग्नाचा विषय निघाला की
यादी पुढे येते
योग्य शिक्षण,
उच्च पगार,
स्वतःचं घर,
शहर पुणे–मुंबईच,
दिसणं ठराविक असावं,
करिअर पूर्ण सेटल,
भविष्याची पूर्ण खात्री…
आणि ही सगळी “पूर्णता” येईपर्यंत
वय मात्र निघून जातं.
तरुणपणात वाटतं
“आपल्याला कोणाची गरज नाही.”
स्वतःचा पैसा आहे,
स्वतःचं आयुष्य आहे,
मित्र आहेत,
स्वातंत्र्य आहे.
पण आयुष्य एकसारखं राहत नाही.
एक वेळ येते
जेव्हा मित्र आपापल्या कुटुंबात गुंततात,
आई-वडील थकतात,
आरोग्य साथ देत नाही,
आणि घरात शांतता बोचायला लागते.
तेव्हा जाणवतं
एकटेपण हे स्वातंत्र्य नसतं,
ते रिकामेपण असतं.
पालकांसाठीही हा प्रश्न गंभीर आहे.
मुलांचं लग्न झालं की
पालकांची एक मोठी जबाबदारी संपते.
ते स्वतःच्या निवृत्त आयुष्याचा विचार करू शकतात.
पण जेव्हा मुलं-मुली
वय ओलांडूनही अविवाहित राहतात,
तेव्हा पालक
स्वतःच्या वृद्धत्वाची चिंता
मनातच दडवून ठेवतात.
“आपण गेल्यावर याचं काय होईल?”
हा प्रश्न
त्यांना शांत झोपू देत नाही.
लग्न म्हणजे फक्त सुखाची हमी नाही…
पण दुःख सोबत वाटून घेण्याची ताकद आहे.
कोणतंही वैवाहिक आयुष्य
फक्त आनंदाचं नसतं.
तिथे संघर्ष असतात,
मतभेद असतात,
आव्हाने असतात.
पण ते एकट्यानं झेलायचे नसतात
सोबत असतात.
जिथे दोन माणसं एकत्र उभी राहतात,
तिथे दुःखही सुसह्य होतं.
ही साथ
पैसा, प्रॉपर्टी किंवा गाडी
कधीच देऊ शकत नाही.
आज आपण कल्पनांचा संसार उभा करतो…
पण वास्तवात उतरायची भीती वाटते.
बायोडाटा म्हणजे
परफेक्ट प्रोफाईल असावी,
काहीही तडजोड नको,
“आपण बेस्टच मिळवणार”
हा हट्ट वाढतो.
पण आयुष्य
कधीच परफेक्ट नसतं.
समज, संवाद आणि जुळवून घेणं
यातूनच संसार उभा राहतो
अटींमधून नाही.
लोकसंख्या वृद्ध होत चालली आहे…
हे फक्त घरगुती नाही, तर राष्ट्रीय वास्तव आहे.
जपानसारख्या देशांमध्ये
वृद्धांची संख्या वाढतेय,
तरुण कमी होतायत,
एकाकी आयुष्य वाढतंय.
आपणही त्याच वाटेवर आहोत
फक्त अजून जाणवत नाही.
आजचा पैसा,
आजचं आरोग्य,
आजचं यश
उद्या तसंच असेलच
याची कोणतीच खात्री नाही.
शेवटी एक कठोर पण आवश्यक प्रश्न
ज्या तडजोडी
आपल्याला ४५–५० नंतर कराव्याच लागणार आहेत,
त्या साठी
संपूर्ण तारुण्य पणाला लावणं
खरंच शहाणपणाचं आहे का?
वेळ गेल्यावर
पर्याय कमी होतात,
समज वाढते
पण वेळ परत येत नाही.
म्हणूनच…
लग्न नको असेल
तर तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असावा.
पण “नंतर बघू” म्हणत
वय निघून जाणं
हा निर्णय नसतो
ती चूक असते.
अपेक्षा ठेवा,
पण दुराग्रह नको.
स्वप्नं ठेवा,
पण वास्तवाशी नातं तोडू नका.
संवाद वाढवा,
भीती कमी करा,
आणि योग्य वेळी
आयुष्याची साथ निवडा.
कारण
काळ निघून गेल्यावर
त्याच्याशी वाद घालता येत नाही.
आणि पश्चाताप
कोणाचंही आयुष्य बदलत नाही.

Comments

  1. ४५–५० नंतर लग्न कठीण होतं”
    — कठीण काय होतं?
    योग्य व्यक्ती शोधणं,
    की समाजाच्या वेळापत्रकात न बसणाऱ्या माणसाला दोष देणं?
    “वेळ गेल्यावर पर्याय कमी होतात”
    — हो,
    पण वाईट पर्याय कमी होणं नुकसान नाही, संरक्षण आहे.
    “लग्न नसेल तर निर्णय जाणीवपूर्वक असावा”
    — आणि लग्न असेल तर?
    भीतीने, दबावाने, “लोक काय म्हणतील” म्हणून घेतलेले निर्णय चालतात का?
    “अपेक्षा ठेवा पण दुराग्रह नको”
    — अपेक्षा कुणी ठेवायच्या?
    ज्यांनी स्वतः कधी जबाबदारी उचलली नाही त्यांनी?
    “वास्तवाशी नातं तोडू नका”
    — वास्तव काय आहे?
    की मुलं म्हणजे वृद्धापकाळाची काठी,
    एकाकीपणाचं औषध आणि समाजात दाखवायची वस्तू?
    “संवाद वाढवा”
    — संवाद कधी?
    मुलं लहान असताना?
    की मोठी झाल्यावर फक्त “लग्न करा” एवढाच?
    “काळ निघून गेल्यावर वाद नको”
    — मग जखमांवर बोलायचं कधी?
    “पालकांची जबाबदारी”
    — ती फक्त लग्न लावून संपते का,
    की आयुष्यभर टिकते?
    “आपण गेल्यावर त्यांचं काय?”
    — आणि मुलं जिवंत असताना त्यांच्या वेदनांचं काय?
    “लग्न म्हणजे सुख-दुःख”
    — मग अपूर्ण, जखमी लोकांनी
    दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख का ओढून आणायचं?
    “परफेक्ट आयुष्य नसतं”
    — पण बेजबाबदारीला ‘अपूर्ण’ म्हणणं फसवणूक आहे.
    “अनिश्चित भविष्य आहे”
    — म्हणून लग्न करून आणखी एक अनिश्चित आयुष्य?
    “लोकसंख्या वृद्ध होत आहे”
    — उपाय काय?
    माणसं घडवायची की फक्त आकडे वाढवायचे?
    “उशीर चूक आहे”
    — नाही.
    जखमा भरल्या नसताना लग्न करणं ही चूक आहे.
    खरा प्रश्न:
    लग्न करून मोरॉन तयार करायचे
    की जबाबदारी घेऊन माणूस घडवायचा?
    लग्न आणि मुलं असणं म्हणजे परिपक्वता नाही.
    परिपक्वता म्हणजे जबाबदारी, संयम आणि मर्यादा ओळखणं.
    अविवाहित व्यक्ती जर गुणवत्ता, क्षमता, वाढ,
    भावनिक बुद्धिमत्ता आणि resilience शोधत असेल,
    तर ते “खूप अपेक्षा” नाहीत.
    अक्षम व्यक्तीशी लग्न करणं तडजोड नाही,
    ते स्वतःवर केलेलं मानसिक नुकसान आहे.
    चुकीचं लग्न करण्यापेक्षा न लग्न करणं आरोग्यदायी आहे.
    शब्द न्यूरल मार्ग घडवतात.
    स्वर आत्ममूल्य घडवतो.
    पुन्हा-पुन्हा होणारे अनुभव attachment style ठरवतात.
    जखमा न भरलेले पालक trauma पुढे देतात.
    मूल वाढवणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही.
    त्यासाठी भावनिक नियंत्रण, जबाबदारी, सातत्य, नम्रता
    आणि चुका झाल्यावर दुरुस्ती लागते.
    “सगळेच मुलं वाढवतात”
    असं म्हणणाऱ्यांना खरी जाणीव नसते.
    “मी बरा/बरी झालो नाही तोपर्यंत लग्न/मूल नको”
    हे टाळाटाळ नाही,
    ते जबाबदार प्रौढत्व आहे.
    मुलं म्हणजे विमा नाहीत,
    भावनिक काळजीवाहू नाहीत,
    वृद्धापकाळाची योजना नाहीत.
    त्यांना जन्माला घ्यायला त्यांची संमती नसते.
    “पुढे ते आपली काळजी घेतील”
    ही अपेक्षा म्हणजे conditional parenting —
    जिच्यातून अपराधीपणा, parentification
    आणि आयुष्यभराची चिंता निर्माण होते.
    “लग्न करा, मुलं होऊ द्या”
    हे भीतीवर आधारित प्रजनन आहे,
    जबाबदार पालकत्व नाही.
    कृपया लोकांना स्वतःला ओळखायला वेळ द्या.
    अर्धवट ज्ञान आणि स्वतःचं न भरलेलं ओझं
    इतरांवर लादू नका 🙏🏻
    लोकांना आधार द्या, माणसं घडवा 🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment