वळणावर थांबलेला प्रवासी


आयुष्य म्हणजे एक अखंड प्रवास. कधी चढ, कधी उतार; कधी सोपे रस्ते, कधी काटेरी वळणे. पण काही वेळा असा एखादा वळण येतो, जिथे थांबावं लागतं. कुठे जायचं, कोणाला सांगायचं, काय करायचं—काहीच कळत नाही.

माणूस असहाय्य होतो. तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो—हे का घडतंय? मी कुठे चुकलो? याचा शेवट काय? पण याच क्षणी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते—"टिकून राहणं." संयम ठेवणं. आणि योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेणं.

जेव्हा संकट समोर उभं राहतं

जेव्हा आयुष्य अनपेक्षित कलाटणी घेतं, तेव्हा माणसाला दोनच गोष्टी सुचतात—लढावं किंवा पळावं. पण काही परिस्थितीत पळून जाणं हा उपाय नसतो, आणि लढायचं तरी कोणाशी? आयुष्याशी? परिस्थितीशी? नशिबाशी? की स्वतःशी?

कधी नाती तुटतात आणि प्रश्न पडतो, "मी एवढं दिलं तरी असं का झालं?"

कधी अपयश येतं आणि वाटतं, "मी इतका प्रयत्न केला, तरी मला यश का मिळालं नाही?"

कधी माणसं सोडून जातात आणि आपण विचार करतो, "मी इतका खराब आहे का?"

कधी आपण कुणासाठी समर्पित होतो, पण समोरचा त्याची कदर करत नाही.


या सगळ्या प्रसंगात एकच भावना असते—अत्यंत हतबलता!

"पान पलटण्यापेक्षा पुस्तकच बदलावं!"

बर्‍याच लोकांना असं वाटतं की, परिस्थिती सुधारण्यासाठी थोडा बदल करायचा, जुनी गोष्ट विसरायची आणि नव्याने सुरुवात करायची. पण कधी कधी, फक्त पानं पलटली तरी काहीच बदलत नाही.

जर तुम्ही वारंवार त्याच नात्यात तुटत असाल, तर कदाचित त्या नात्याचा विचारच सोडणं योग्य.

जर तुम्ही सतत संघर्ष करताय, पण प्रगती नाही, तर कदाचित मार्गच बदलणं योग्य.

जर तुम्ही वारंवार अपमान सहन करताय, तर तिथून बाहेर पडणं गरजेचं.

कारण काही पुस्तकं वाचायची नसतात, तर सोडून द्यायची असतात.

संयम कसा ठेवायचा?

संकटं आली की माणूस दोन टोकांवर जातो—कधी तो निराश होतो, कधी तो आक्रमक होतो. पण कोणत्याही परिस्थितीत संयम महत्वाचा.

१) स्वतःला वेळ द्या

कोणताही मोठा निर्णय ताबडतोब घेऊ नका. दुःख, राग, निराशा या भावनांच्या आहारी गेलात, तर चुकीचा निर्णय होईल. त्याऐवजी स्वतःला शांत करा.

२) बाहेरचं ऐकायचं, पण निर्णय स्वतः घ्यायचा

लोक तुमच्या परिस्थितीवर वेगवेगळे सल्ले देतील. पण अखेर निर्णय तुमच्या जगण्याचा आहे, त्याला तुम्हीच जबाबदार असाल.

३) बदल स्वीकारा

काही गोष्टी बदलता येत नाहीत. पण आपण त्या स्वीकारून पुढे जाऊ शकतो. तुटलेली नाती, न मिळालेलं यश, झालेली चूक—यात अडकून राहण्यापेक्षा नवीन सुरुवात करणं केव्हाही चांगलं.

४) स्वतःला कमी लेखू नका

"मी अपयशी आहे," "मी चुकलो," "माझं काहीच होणार नाही"—अशा नकारात्मक विचारांनी आत्मसन्मान ढासळतो. त्याऐवजी स्वतःला समजून घ्या, चुका सुधारायचा प्रयत्न करा आणि पुढे चला.

आपल्या समाजात लोक संकटात सापडलेल्या माणसाला मदत करायच्या ऐवजी त्याचं नुसतं विश्लेषण करतात.

जर एखाद्याचं नातं तुटलं, तर त्याला आधार देण्याऐवजी विचारलं जातं—"काय चुकलं असेल?"

जर कुणाला अपयश आलं, तर त्याला सांभाळण्याऐवजी म्हणतात—"कष्ट कमी पडले असतील!"

जर कुणी नैराश्यात असेल, तर त्याला समजून घेण्याऐवजी बोललं जातं—"इतका कमकुवत का?"


माणूस आधीच संकटात असतो, त्यावर अशा समाजाच्या प्रतिक्रियांचा भार वाढतो. म्हणूनच, समाजाचा विचार न करता स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायला शिकणं गरजेचं आहे.

नवा अध्याय सुरू करायचा का?

प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवतं. पण काही वेळा, पुस्तक संपल्यावर ते बंद करणं आणि नवीन पुस्तक उघडणं आवश्यक असतं.

जुन्या जखमा उघड्या ठेवून त्यांना कुरवाळण्यापेक्षा नवीन आयुष्य सुरू करणं कधीही चांगलं.

आयुष्य तुम्हाला जिथे न्यायचंय, तिथे न्यायला हवं; समाज काय म्हणतोय, याचा विचार न करता.

मनात शंका असली तरी, आत्मविश्वासानं पुढे जावं.

"पुस्तक बंद करा, नवीन सुरुवात करा. कारण आयुष्य एका अपूर्ण पानावर थांबायला नाही, तर पुढे जाण्यासाठी आहे!"


Comments

Popular Posts