स्त्रीकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोनच ठरवतो तू माणूस आहेस की राक्षस!
समाजात स्त्रीच्या अस्तित्वाला नेहमीच दोन टोकांची व्याख्या दिली जाते. एकीकडे तिला देवीचा दर्जा दिला जातो, आणि दुसरीकडे तीच स्त्री वासनांच्या नजरेत अडकवली जाते. एका मुलीचं सौंदर्य तिच्या आत्मविश्वासाचं प्रतीक असावं, पण त्याकडे काही विकृत नजरा भक्षकासारखी पाहतात. प्रश्न हा आहे की, स्त्री म्हणजे एक वस्तू आहे का? तिचं सौंदर्य म्हणजे केवळ उपभोगासाठी आहे का?
"स्त्री"—एका व्यक्तीपेक्षा जास्त, पण समाजाला फक्त शरीर दिसतं!
स्त्री ही कोणाच्या तरी घराची कन्या, बहीण, आई किंवा पत्नी आहे, हे सगळ्यांना माहीत असतं. पण तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहायला हा समाज का विसरतो? तिला स्वतःच्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे, पण समाज अजूनही तिच्या कपड्यांवर, तिच्या हसण्यावर, तिच्या चालण्यावर निर्बंध घालतो.
स्त्री सुंदर दिसली की समाजाच्या नजरा बदलतात, पण का?
स्त्रीचं सौंदर्य तिच्या अस्तित्वाचा एक भाग आहे, तिच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. पण त्या सौंदर्याला उपभोगायची वस्तू समजणाऱ्या मानसिकतेमुळेच अनेक स्त्रिया सतत भीतीच्या छायेत जगतात.
"आईच्या कुशीत तू सुरक्षित होतास, मग आज तिच्या अस्तित्वावर प्रश्न का?"
लहानपणी तुझी आईच होती, जिला तू पहिल्यांदा पाहिलंस, जिच्या कुशीत तू शांत झोपलास, जिच्या हातांनी खाऊन तू मोठा झालास. तीच आई जेव्हा दुसऱ्या स्वरूपात समाजात असते, तेव्हा तिच्या शरीरावर तुझ्या वासनेच्या नजरा का फिरतात?
ज्या छातीवर तुझ्या लहान ओठांनी प्रेम केलं, त्याच छातीला आज तुझ्या वासनांध नजरा का भेदू पाहतात?
जिच्या पदरात झोपताना तुला सुरक्षित वाटायचं, तिच्याच अस्तित्वाला आज प्रश्न का?
जिच्या हातांनी तुला सांभाळलं, तिच्या हातावर तू निर्लज्ज टीका करतोस?
"स्त्री मुक्त झाली की समाजाला असुरक्षित का वाटतं?"
स्त्री शिकली, पुढे गेली, स्वतःच्या पायावर उभी राहिली की समाजाच्या बोटांना का आग लागते? तिनं ठरवलं की आपण कोणत्याही पुरुषाच्या छायेखाली न जगता स्वतंत्र विचार करायचा, तर समाजाच्या मानसिकतेला धक्का का बसतो?
तिने साडी घातली की ती सुसंस्कारी, आणि जिन्स घातली की बेशरम—हा भेदभाव स्त्रीच्या कपड्यांवर नाही, तो पुरुषी मानसिकतेत आहे.
"समाज बदलायचा, की स्वतः?"
स्त्रीला देवी मानायचं, पण तिचं अस्तित्व स्वच्छ दृष्टीने पाहायचं नाही—ही विकृत मानसिकता आहे.
आजही रस्त्यावर एक मुलगी जात असताना कित्येक नजरा तिला त्रास देतात. पण प्रश्न असा आहे की समाजानं सुधारायचं, की माणसानं स्वतःचं मन बदलायचं?
जर प्रत्येक पुरुषाने स्वतःच्या नजरेतले भाव आरशात पाहिले, तर त्याला समजेल की सुधारणा समाजात करायची नसते, ती स्वतःपासून सुरू करायची असते!
"स्त्री ही शरीर नाही, ती एक विचार आहे."
स्त्रीकडे केवळ शरीर म्हणून पाहणं बंद केलं तर कदाचित समाजाची नजरही शुद्ध होईल. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं तरच एक सशक्त समाज उभा राहील.
स्त्रीला फक्त वासना आणि भोग याच्या पलीकडे पाहा—ती एक आई, बहीण, सखी, आणि स्वतःच्या आयुष्याची नायिका आहे!
Comments
Post a Comment