स्वतःसाठी जगण्याचा गुन्हा?


आपल्या समाजात एक विचित्र पद्धत आहे – स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी असणं. तुम्ही तुमच्यासाठी काही करायला गेलात की, लगेच एखादा उठून म्हणतो,
"एवढं स्वार्थी होऊ नका!"
"इतरांचा विचार करा!"
"कुटुंबासाठी काही त्याग करावा लागतो!"

पण हा त्याग करताना आपण स्वतःलाच हरवून बसलो, तर?

बालपणापासून आपल्याला शिकवलं जातं – "दुसऱ्यांना आनंद द्या, दुसऱ्यांचं ऐका, समाज काय म्हणेल याचा विचार करा!" आणि हळूहळू आपण समाजासाठी, कुटुंबासाठी, जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला विसरायला लागतो. आपल्या आवडीनिवडी मागे पडतात. स्वप्नांना गाडून टाकतो. मनाला लागणाऱ्या गोष्टी उरात दाबून फक्त 'योग्य' तेच करत राहतो.

स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा मनभरून मुक्त श्वास घ्यावासा वाटतो. सगळ्या बंधनांपासून दूर पळावंसं वाटतं. पण आपण तसे करत नाही. का?

कारण समाजाच्या चौकटी.
"तुला हे करू नये!"
"असं वागणं शोभत नाही!"
"तुझ्या वयाला हे शोभतं का?"

असं ऐकत ऐकत आपण स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी करतो आणि त्याच भिंतीत स्वतःला कैद करून टाकतो.

कोणाला करियरमध्ये बदल करायचा असतो, कोणाला एकटं राहायचं असतं, कोणाला प्रवास करायचा असतो, कोणाला जुनं सगळं सोडून नव्याने सुरुवात करायची असते… पण समाजाच्या भीतीने, जबाबदारीच्या ओझ्याने आपण फक्त विचार करतो, कृती नाही.

"आरशातल्या व्यक्तीला ओळखायला शिका"

रोज आपण आरशात पाहतो, पण खरंच त्यातली व्यक्ती ओळखतो का?
आरशात जेव्हा स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो, तेव्हा तिथे काय दिसतं? एक आनंदी चेहरा, की एक नकली हास्य लावलेली थकलेली व्यक्ती?

आयुष्यात दुसऱ्यांसाठी खूप काही करतो आपण, पण स्वतःसाठी काही केलं की अपराधी वाटतं. कारण समाजाने आपल्याला 'स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ' असं शिकवलंय.

पण खरं तर स्वतःला ओळखणं, स्वतःचं मन ऐकणं आणि स्वतःसाठी वेळ देणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही, तर मानसिक शांततेसाठी आवश्यक आहे.

"स्वतःसाठी जगण्याचा अपराधभाव सोडा!"

तुम्हाला काहीतरी नवीन करायचंय? करा!

लोक काय म्हणतील याची चिंता सोडा!

मनासारखं एक दिवस जगा!

जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत, पण तुम्हीही तितकेच महत्त्वाचे आहात.

स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा. कारण जगात कोणीही तुमच्यासाठी तितकं वेळ देणार नाही, जितका तुम्ही स्वतःला देऊ शकता.

"कधीतरी मनसोक्त मोकळं व्हा… स्वतःसाठी!"

#स्वतःसाठी_जगा #मनाची_शांती #आयुष्य #मुक्तता #SelfLove #MarathiMotivation #MarathiQuotes


Comments

Popular Posts