अडथळ्यांची शर्यत माणूसपण हरवताना...

रात्रीचे दोन वाजले होते. एकटा अमोल रिकाम्या रस्त्यावर बसून होता. काही वेळापूर्वीच त्याला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. कारण साधं होतं—त्याचं आर्थिक स्थैर्य डळमळीत झालं होतं. घरच्यांना वाटत होतं, तो आता निरुपयोगी झाला आहे.

कधीकाळी ज्यांच्या सुखासाठी रात्रंदिवस झिजला, ज्यांच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, त्याच लोकांनी आज त्याला नकोसं केलं होतं. कारण तो पैसा देऊ शकत नव्हता. माणूसपणाच्या या व्यवहारात भावना गहाण ठेवल्या गेल्या होत्या.

गरिबी व पैशाचं राजकारण

समाजात गरिबी ही वाईट समजली जाते, पण खरी खंत त्या गरिबीपेक्षा वेगळी असते. माणूस पैसा नसल्यामुळे खचत नाही. त्याला खऱ्या अर्थाने जेव्हा तोडलं जातं, तेव्हा त्याला स्वतःच्या माणसांकडून परकेपणाची जाणीव करून दिली जाते.

हक्काच्या माणसांचं परकं होणं

कुठल्याही संकटात माणसाला आधार हवा असतो. तो आधार रक्ताच्या नात्यांमध्ये मिळतो, असं आपण समजतो. पण हळूहळू कळतं की नातेसंबंधही आता गरजांवर आधारलेले आहेत.

घरात असताना तुम्ही कमावते आहात, जबाबदाऱ्या पेलत आहात, तोपर्यंत तुमचं अस्तित्व टिकून असतं. पण एकदा तुमचं अर्थकारण डळमळीत झालं, की त्याच घरात तुम्ही "नकोसे" ठरता.

अमोलला आठवत होतं—तो सुखी असताना नातेवाईकांमध्ये त्याचा सन्मान होता. गावातही आदर होता. पण जसं त्याच्यावर आर्थिक संकट आलं, तसं त्याचं अस्तित्वच पुसलं गेलं. समाज अशाच वागणुकीचं दुसरं नाव आहे.

आपल्याकडे माणसाच्या स्वभावावर नव्हे, तर त्याच्या पैशावर नाती अवलंबून असतात. म्हणूनच एका श्रीमंताच्या चुकीवरही पांघरूण टाकलं जातं, पण गरिबाच्या छोट्याशा चुकाही मोठ्या केल्या जातात.

खऱ्या माणसांची ओळख संकटातच होते

जेव्हा माणसावर कठीण प्रसंग येतो, तेव्हाच त्याला कळतं की कोण खऱ्या अर्थाने आपल्यासोबत आहे आणि कोण फक्त सोयीपुरता. हक्काची माणसं जेव्हा दुखात दूर जातात, तेव्हाच माणूस सर्वात जास्त खचतो.

त्याच्या मनाला वेदना होतात, त्याला स्वतःचा न्यूनगंड वाटू लागतो. एकेकाळी त्याच्या सावलीसुद्धा सोबत घेणारी माणसं, आता त्याचं अस्तित्व टाळू लागतात. हीच खरी भीती असते—पैसे नसण्याची नाही, तर नात्यांची खरी परीक्षाच नसण्याची.

आज माणूस माणसाशी नातं जोडतो, पण आधारासाठी नव्हे, तर सोय पाहून. कुणी तुमच्याशी चांगलं वागत असेल, तर तो खरोखरच चांगला आहे की त्याला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे, हे ओळखायला शिका.

कारण पैसा हातचा जाऊ शकतो, पण खऱ्या माणसांची ओळख हीच तुमची खरी कमाई असते. आणि ती कमाई गमावली, की मग माणूस खरंच हरवतो.

Comments

Popular Posts