आरशातलं वास्तव


रात्रभर जागरण झालं होतं. नंदिनी तिच्या खोलीत खिडकीतून बाहेर बघत बसली होती. डोळ्यांत पाणी जमा झालं होतं, पण त्या आसवांना बाहेर पडायची परवानगी नव्हती. लग्नाला चारच महिने झाले होते, पण संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या नंदिनीला हा प्रवास रोज एका नवीन त्रासातून जात होता.

सासरच्या घरातलं वातावरण पहिल्यापासूनच थोडं तंग होतं. घरात सासू, सासरे, दीर, नणंद—सगळे होते, पण कुणालाच तिच्या मनाची कदर नव्हती. स्वयंपाकात थोडीशी चूक झाली तरी टोमणे ऐकावे लागायचे. कपडे घातले तरी "सून का शोभेल असे कपडे घाल" अशी टीका. नवरा रोहन मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचा. "सगळे असेच असतात, तुला जुळवून घ्यावं लागेल," एवढंच तो म्हणायचा.

नंदिनी एके दिवशी आईला फोन करत म्हणाली, "आई, मला घरी यायचंय काही दिवस."
आई म्हणाली, "बाळा, सासर हेच तुझं खरं घर आहे. तिथेच जुळवून घेत जा."

नंदिनी मनात म्हणाली, "माझं खरं घर? पण इथे कुणालाच माझ्या भावना कळत नाहीत. सगळं ऐकून घ्यायचं, सहन करायचं, आणि कोणालाच काही बोलायचं नाही—हेच काय स्त्रीचं जीवन?"

ती वडिलांना फोन करणार होती, पण आठवलं—तेही हेच म्हणतील. समाजाने स्त्रियांना शिकवलंच आहे की सहन करायचं. नवरा मारला तरी गप्प, घरच्यांनी अपमान केला तरी गप्प, संसार टिकवायचा म्हणून सगळं सहन करायचं.

कुठेतरी वाचलेलं आठवलं—"समाजाला सवय आहे फक्त स्त्रीला समजावण्याची, पुरुषांना नाही."

त्या रात्री नंदिनीने ठरवलं, आता ती गप्प बसणार नाही. तिने रोहनला सांगितलं, "मी जशी आहे तशीच स्वीकारायचं असेल, तरच हा संसार चालेल. नाहीतर मी या नात्यात गुदमरून मरणार आहे."

पहिल्यांदाच रोहनला जाणवलं, की त्याने खरंच नंदिनीला एकटी सोडलंय. सासरच्यांनीही पहिल्यांदा विचार केला की नंदिनी हे असं का बोलतेय. तिने एक नवा आरसा दाखवला होता—समाजाने दिलेल्या जुन्या कल्पनांचा.

त्या दिवशी तिला घर सोडून जावं लागलं. पण जाताना तिने एक गोष्ट ठरवली होती—"मी पुन्हा अशी हतबल होणार नाही. मी स्वतःसाठी उभी राहीन!"

समाज अजूनही विचारतो—"तू नवऱ्याला समजावलं असतंस, जुळवून घेतलं असतंस, तर संसार सुखाचा झाला असता ना?"

ती हसते आणि म्हणते—"जर प्रत्येक स्त्रीने जुळवून घेतलं तर समाज कधी सुधारला असता का?"

Comments

Popular Posts