झोप हरवलेली माणसं
रात्र होताच माणसं झोपतात असं म्हणतात, पण खरंच सगळे झोपतात का?
काही जण डोळे मिटतात, पण मन मात्र विचारांच्या गदारोळात अडकलेलं असतं. जीवनाच्या अशा काही वळणांवर आपण येतो, जिथे झोप ही फक्त एक कल्पना उरते. शरीराने कितीही दमलो तरी मनाला शांतीचं एक कणभरही सुख मिळत नाही.
काहींची झोप जबाबदाऱ्यांनी हरवलेली असते.
एक बाप रात्रभर तळमळत पडलेला असतो, उद्याच्या पैशाच्या हिशेबात अडकलेला. घराच्या EMI पासून ते लेकरांच्या शिक्षणाच्या खर्चापर्यंत प्रत्येक विचार त्याच्या झोपेवर अतिक्रमण करतो.
काहींची झोप आठवणींनी हरवलेली असते.
कोणीतरी भूतकाळात हरवलेला असतो, एखाद्या अपूर्ण प्रेमाच्या आठवणींमध्ये, जे आता परत येणार नाही. त्याच्या मनात सतत एकच विचार – "जर त्या वेळी मी वेगळं केलं असतं तर?" या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता त्याची रात्र निघून जाते.
काहींची झोप समाजाने हिरावून घेतलेली असते.
कोणीतरी अन्याय सहन करून झोपायचा प्रयत्न करतो, पण मनाला शांतीचं सुख मिळत नाही. समाजाच्या दुटप्पी वागणुकीमुळे, विषमतेच्या भिंतींमुळे, खोट्या प्रतिष्ठेच्या खेळामुळे अनेकांची झोप उडालेली असते.
काहींची झोप तंत्रज्ञानाने हरवलेली असते.
आजचा माणूस रात्री उशिरापर्यंत स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसलेला असतो. सोशल मीडियाच्या या बनावट जगात स्वतःला हरवत जातो. मनात अर्धवट समाधान, तुलना, आणि दुसऱ्यांचं सुख पाहून निर्माण होणारी असुरक्षितता झोपेसोबत त्याचं नातंच तोडून टाकते.
समाज मोठ्या गाजावाजाने पुढे जातोय असं दाखवलं जातं, पण खरं पाहिलं तर हा समाज झोपलेलाच आहे—संवेदनशून्य, निष्क्रिय आणि दिखाऊ!
गरीब माणसाच्या दुःखाने या समाजाची झोप उडत नाही, पण रात्री इंटरनेट बंद झालं तर मात्र तो बेचैन होतो. कुणाच्या जखमा पाहून लोक गप्प बसतात, पण कुणाची व्हायरल पोस्ट पाहून लगेच प्रतिक्रिया द्यायला तयार असतात.
एका बाजूला कोणी तरी उपाशी झोपतो, आणि दुसऱ्या बाजूला अन्नाची नासधूस होते. एका बाजूला शिक्षणासाठी झगडणारी मुलं असतात, आणि दुसरीकडे पैशाच्या जोरावर मिळणाऱ्या पदव्या! समाजाच्या या दुटप्पीपणामुळे झोप कुणाची उडते? गरीबाची! कष्टकऱ्याची! पण श्रीमंतांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी, मोठ्या लोकांसाठी हा समाज "शांत" झोपलेलाच असतो.
"कोणाला जाग येणार?"
या समाजाला कधीच प्रश्न पडत नाहीत—
कोणी तरी अन्याय सहन करतोय, तरीही आवाज उठवला जात नाही. कुणाचं घर जळतं, पण शेजाऱ्यांना त्यात रस नसतो. लाचखोरी, भ्रष्टाचार, फसवणूक या सगळ्याला आपण इतकं सरावलेलो आहोत की आता काहीही झालं तरी फरक पडत नाही.
रात्रभर छताकडे पाहणाऱ्या माणसांना खरं दुःख याचं असतं—आपण एकटे आहोत. कोणी तरी आपल्याला विचारावं, "काय झालंय?" आणि खरंच ऐकावं, अशी अपेक्षा असते. पण हे प्रश्न विचारणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण माणसांच्या वेदनांपेक्षा, सोशल मीडियावरच्या लाइक्स, ट्रेंड्स आणि व्हिडिओंना जास्त महत्त्व दिलं जातंय.
"उद्या कदाचित झोप लागेल!"
कधी कधी असं वाटतं, की समाजाला खरंच जाग येईल का? काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत, पण तरीही मन स्वतःलाच समजावत राहतं—"उद्या कदाचित शांत झोप मिळेल!"
कदाचित उद्या कोणी तरी खरंच विचारेल, "तू एकटा नाहीस!"
कदाचित उद्या या झोपलेल्या समाजाला जाग येईल...!
Comments
Post a Comment