लोक काय म्हणतील?

"लोक काय म्हणतील?" या एका वाक्यात किती जणांचं आयुष्य अडकलंय, हे मोजता येईल का? घरात मुलगी थोडं उशिरा आली तरी "बघा, बघा! काय चाललंय!" म्हणणारे, तर मुलगा उशिरा आला की "स्वतःच्या पायावर उभा राहतोय!" असं म्हणणारे, हे समाजाचं दुहेरी चेहऱ्याचं वास्तव नाही का?

समाजाचा नियम असा आहे—तुम्ही काही केलंत तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार. तुम्ही मोठ्या गाडीत फिरलात तर "पैसा आला की माणूस बदलतो!" म्हणणारे हेच लोक, सायकलवर दिसलात तर "अजून काही कमावलं नाही का?" म्हणून तोंड फिरवतात.

कोणाचं लग्न उशिरा झालं की "नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल," लग्न लवकर झालं की "घाई केली का एवढी?" मुलं झाली नाहीत तर "काय रे, डॉक्टरला दाखवलं का?", आणि झाली तर "एकाच मुलावर थांबणार का?" असं विचारतात.

स्त्री असो किंवा पुरुष, समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळे शिक्के मिळतात. मुलीने करिअरला प्राधान्य दिलं तर "काय गरज होती नोकरीची?", आणि संसारात रमली तर "अगं, थोडं स्वतःसाठीही काही कर!" म्हणणारे हेच.

साडी नेसली तर "आजीसारखी दिसतेस!", आणि जिन्स घातली की "हद्दच आहे!" असं म्हणणारे, हे कोण? आपणच ना?

स्वतःसाठी जगणं गुन्हा आहे का?

आपल्याला नेहमी शिकवलं जातं—समाजात मिसळून राहा. पण कधी विचारलंत का, हा समाज आहे तरी कोण? आपलं घर, आपले मित्र, आपलं कुटुंब, आणि आपल्या भोवती असणारे काही अपरिचित चेहरे. हेच ते लोक, जे आपल्याबद्दल काही ना काही बोलणारच!

मग करायचं काय?

तर उत्तर अगदी साधं आहे—"लोक म्हणतील" या भीतीत न जगता, "मी काय म्हणतो?" याचा विचार करा. लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम तुमचं आयुष्य जगणं.

म्हणूनच...

तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकलात, की हेच लोक तुमचं कौतुक करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. आधी जे "उद्धट" म्हणायचे, तेच "स्वाभिमानी" म्हणतील. आज जे "वेगळ्या वाटेवर चालतोय" म्हणतात, तेच उद्या "प्रेरणादायी" म्हणतील.

शेवटी, लोक काहीही म्हणोत, तुम्ही तुमचं आयुष्य तसंच जगा—जसं तुम्हाला हवं आहे!

©® Sandeep Chavan ✍🏻

आवडल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका 😊 

आपला अभिप्राय नक्की नोंदवा म्हणजे आम्हाला ही पुढे लेखनास प्रेरणा मिळेल 

नोट: लेख कॉपी पेस्ट केल्यास कारवाही केली जाईल

Comments

Popular Posts