नकोसे झालेले अस्तित्व
संध्याकाळची वेळ होती. राधाबाई मंदिराच्या पायरीवर बसल्या होत्या. त्यांचे वय साठ-पासष्टीच्या आसपास. चेहऱ्यावर थोडीशी मरगळ, पण डोळ्यांत मात्र एक विचित्र शांतता होती. रोज संध्याकाळी त्या मंदिरात येऊन बसायच्या, देवापाशी मन मोकळं करायच्या आणि पुन्हा आपल्याच संकुचित घरट्यात परतायच्या.
राधाबाईंच्या आयुष्याचा एकमेव आधार म्हणजे त्यांचा मुलगा – रोहित. शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळाली आणि नंतर लग्न. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू घरातल्या गोष्टी बदलायला लागल्या. सुनेच्या आणि त्याच्या संसाराच्या गरजा वाढत गेल्या, आणि त्यात राधाबाई कुठेतरी बाजूला पडू लागल्या.
पहिले काही महिने सुनेच्या चेहऱ्यावरचा तुसडेपणा सहन केला. नंतर रोहितही बदलला. बोलण्याची भाषा बदलली, वागणं बदललं. राधाबाईंच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढल्या जाऊ लागल्या. "आई, तुम्ही जुन्या पद्धतीच्या आहात." "आई, तुम्हाला काही समजत नाही!" असं ऐकायला मिळू लागलं. घरात असूनही त्या परक्यासारख्या झाल्या.
"आई, तुम्ही मामा कडे जाऊ शकता का?"
एके दिवशी रोहितने सरळ विचारलं.
"का रे?" राधाबाईंनी धीराने विचारलं.
"तसं काही नाही ग, पण... इथे तुला कंटाळा येत असेल ना?"
खरं कारण समजलं होतं त्यांना. नव्या संसारात, नव्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी जागा उरली नव्हती. त्यांनी काहीही न बोलता हसत मान हलवली आणि दुसऱ्याच दिवशी मामाकडे जाण्यासाठी सगळं आवरलं.
मामाच्या घरी गेल्यावर दोन-तीन दिवस ठीक गेले, पण लवकरच तिथेही 'बोझं' असल्याची जाणीव झाली. मामाच्या सुनेच्या डोळ्यात तीच नाराजी होती, जी आपल्या सुनेच्या डोळ्यात पाहिली होती.
एक दिवस रात्री उशिरा, राधाबाईंनी एक पिशवी घेतली आणि गुपचूप निघून गेल्या.
आज संध्याकाळी त्या मंदिराच्या पायरीवर बसल्या होत्या. त्यांनी ठरवलं – कोणाच्याही आयुष्याचं ओझं होण्यापेक्षा स्वतःच आयुष्य मोकळं जगावं. त्या अनाथाश्रमात जाण्याचा विचार करत होत्या, जिथे त्यांचं अस्तित्व ‘तोंडदेखलं’ सहन केलं जाणार नाही, तर मनापासून स्वीकारलं जाईल.
त्या उठल्या, मंदिराच्या समोर वाकून नमस्कार केला आणि त्या मार्गाला लागल्या... त्यांच्या आनंदासाठी स्वतःच घर मागे टाकत.
वृद्ध आई-वडिलांना प्रेमाने स्वीकारण्याऐवजी आपण त्यांना ओझं का समजतो? वृद्धापकाळात माणसाला नात्यांची गरज असते, आणि जेव्हा तीच नाती त्यांच्यापासून दूर जातात, तेव्हा त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी ते स्वतःहून बाजूला होतात.
"कदाचित कोणावर ओझं होण्यापेक्षा त्या जागेवरून त्यांच्या आनंदासाठी निघून गेलेलं बरं असतं!"
Comments
Post a Comment