नात्यांमधली समजूतदारपणाची कसोटी
रात्री उशिरा समीर गॅलरीत बसून होता. त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. दिवसभर त्याने ऑफिसमध्ये कितीही कठोरपणे वागलं, तरी घरी आल्यावर त्याला कोणीतरी समजून घ्यावं, असं वाटत होतं. पण त्याच्या भावना कधी कुणाला समजल्या नाहीत.
समाज पुरुषाला नेहमीच कणखर असण्याची जबरदस्ती करतो. "पुरुष म्हणजे अश्रू न गाळणारा, भावना न दाखवणारा, फक्त जबाबदारी पेलणारा" असंच समीकरण समाजानं तयार केलं आहे. पण सत्य वेगळं आहे—पुरुषही हळवा असतो.
पुरुष भलेही बाहेरगावी काम करत असतील, मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतील, पण त्यांचीही मनाची तगमग असते.
त्यांना प्रत्येक गोष्टीचं ओझं पेलायचं असतं—घराचं, नात्यांचं, समाजाचं. आणि त्यात जर कोणी त्यांच्या भावना समजून घेत नसेल, तर त्या ओझ्याचं दडपण आणखी वाढतं.
त्यांची हळवी बाजू फार कमी लोकांना कळते. ते हसतात, बोलतात, पण आतून तुटलेले असतात.
बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की "स्त्रीने समजूतदार असायला हवं, तिने पुरुषाच्या मनातलं वाचायला हवं." पण हे एकतर्फी का?
जर पुरुषाचा थोडासा कठोर स्वभाव समजून घेणं स्त्रीचं काम असेल, तर स्त्रीच्या भावना समजून घेणंही पुरुषाने शिकायला हवं.
स्त्रीला सतत अपेक्षा केली जाते की तिने त्याच्या शांततेत दडलेलं दुःख समजावं, त्याला समजूतदारपणे हाताळावं. पण ती थकली, तुटली, तर तिच्या वेदना समजून घ्यायला कोण असतं?
काही लोक फक्त नात्यांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठीच जन्माला आलेले असतात. ते स्त्रीला सांगतात—"तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतो," आणि पुरुषाला सांगतात—"ती तुला बदलायचा प्रयत्न करते."
नाती अशीच तुटतात. समाजात असे अनेक लोक असतात, जे प्रेमात असलेल्या दोन माणसांना एकत्र येऊ देत नाहीत. त्यांना घरातील शांतता, दोघांमधील समजूतदारपणा सहन होत नाही.
त्यामुळे नातं टिकवायचं असेल, तर एकमेकांना खरंच समजून घ्यायला शिकायला हवं, बाहेरच्या लोकांच्या बोलण्याने प्रभावित न होता.
नातं फक्त जबाबदारीचं नसतं, ते एकमेकांना समजून घेण्याचं असतं
नात्याचं खरं सौंदर्य त्यातल्या समजूतदारपणात आहे.
जर पुरुष कठोर दिसतो, पण आतून हळवा आहे, तर त्याला समजून घ्यायला हवं.
जर स्त्री मनाने थोडीशी अस्थिर आहे, तुटलेली आहे, तर तिलाही समजून घ्यायला हवं.
नातं टिकवायचं असेल, तर "फक्त एकाने समजून घ्या" हा नियम मोडून, दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला शिकायला हवं.
कारण नातं एका बाजूने लावलं जात नाही, त्यासाठी दोन्ही बाजूंचा प्रयत्न लागतो.
"समजूतदारपणा नसेल, तर कोणतंच नातं टिकत नाही!"
Comments
Post a Comment