नात्यांच्या विटाळलेल्या छायेत

आजकालच्या समाजात नाती झपाट्यानं बदलत आहेत. प्रेम, विश्वास, आणि जबाबदारी यांचं नातं फक्त शब्दांपुरतं उरलंय. लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र बंधन, पण जर त्यातच विश्वासघात, कपट आणि क्रौर्य शिरलं, तर नात्यांचं अस्तित्व राखणारं कसं?

आजचीच बातमी पाहा—एका पत्नीने आपल्या पतीला तिच्या प्रियकरासोबत मिळून निर्दयपणे संपवलं आणि पुरावा मिटवण्यासाठी त्याला ड्रममध्ये सिमेंटने बंद करून टाकलं. ही घटना ऐकली आणि अंगावर काटा आला. कधी काळी प्रेमाचं, विश्वासाचं प्रतीक असलेलं लग्न आता काहींना बंधन वाटायला लागलंय, ज्यातून मुक्त होण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.

असं घडलं तरी का?

समाज बदलतोय, तसं माणसांचं विचारही बदलतंय. प्रेमाचं स्वरूप बदललंय. आधी प्रेम म्हणजे त्याग, समर्पण आणि सहवास असायचं. आता मात्र स्वार्थ, भौतिक सुखं आणि तात्पुरत्या भावनांच्या आहारी जाऊन माणसं वागतायत. यामध्येच विश्वासघाताचा विषाणू पसरतोय.

आज स्त्री-पुरुष दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेत. त्यात वाईट काही नाही, पण त्या स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड हवी. आपल्याला काहीही करण्याचं स्वातंत्र्य मिळालंय म्हणजे त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. एकदा लग्न झालं की, जोडीदाराशी प्रामाणिक राहणं ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर ती नैतिकतादेखील आहे. पण हल्ली पती-पत्नी एकमेकांवर संशय घेतात, एकमेकांना वेळ देत नाहीत, त्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. त्या दरीतूनच बाहेरच्या लोकांना शिरकाव मिळतो आणि मग नाती विटाळतात.

"भोग भोगावे लागतील" हा नियम विसरला जातोय

आता या घटनेत जरा खोलवर डोकावून पाहा. एका स्त्रीला तिच्या पतीपासून इतका तिटकारा का वाटला असेल? ती त्याला समजून सांगू शकली असती, घटस्फोटाचा मार्ग स्वीकारू शकली असती, पण तिनं थेट खुनी मार्ग का निवडला? याचा अर्थ कुठेतरी तिच्या मनात प्रेमाऐवजी वासना आणि लालसेचं अधिराज्य असावं. हाच स्वार्थ समाजाला पोखरतोय.

हे असं वागून ती सुटली का? नाही. हत्या करून कोणीही सुखी झालेलं नाही, ना होणार. कारण कृत्य कितीही लपवलं, तरी मनातली अपराधी भावना उघडी पडतेच. काही वेळा कायद्याचा दंड लागतो, तर काही वेळा आयुष्यभर पश्चात्तापाची शिक्षा भोगावी लागते.

या घटनेवर आपण केवळ एक बातमी म्हणून विचार करणार का? की यातून काही शिकणार? हे केवळ त्या महिलेचं किंवा त्या पतीचं वैयक्तिक दुर्दैव नाही, तर हे आजच्या समाजाचं वास्तव आहे. अनेक लोक अशाच गुंत्यात अडकले आहेत—जेव्हा नाती तुटतात, तेव्हा सहजीवनाची संकल्पना नष्ट होते. लोक इतके असंवेदनशील कसे होतात, हा मोठा प्रश्न आहे.

प्रेम, विवाह, नाती आणि त्यातली जबाबदारी यांची पुनर्व्याख्या करणं गरजेचं आहे. नात्यांमध्ये संवाद वाढला पाहिजे, गरजा आणि अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. एकमेकांच्या भावना जपल्या पाहिजेत. अन्यथा अशा क्रूर घटना फक्त बातम्यांपुरत्या राहणार नाहीत, तर त्या आपल्या आसपासच्या वास्तवाचा भाग होतील.

म्हणूनच...

नाती टिकवायची असतील, तर विश्वास आणि समर्पणाची गरज आहे. कोणत्याही नात्यात तडजोड हवीच, पण तडजोड नसेल, तरी संवाद असावा. अडचणी असतील, तर योग्य मार्गाने त्यावर उपाय शोधावा. हिंसक मार्गाने कधीही समाधान मिळत नाही.

समाज बदलतोय, पण आपण कुठे चाललोय, हे समजून घेणंही गरजेचं आहे. नाहीतर अशीच एखादी घटना उद्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींच्या बाबतीत घडलेली असेल... आणि तेव्हा आपण नुसतं "असं का झालं?" म्हणून हतबल होऊ.


Comments

Popular Posts