अपूर्ण शरीर, पूर्ण प्रेम आणि स्वार्थी समाज
आजचं जग हे तंत्रज्ञानाने समृद्ध झालं असलं तरी माणुसकीच्या मुळांना पोखरून टाकणारं आहे. प्रेम कधी काळी आत्म्यांची भेट होती, मनाची सलगता होती, तर आज ते फक्त शरीरांची बाजारपेठ झाली आहे.
ज्याचं शरीर अपूर्ण आहे, ज्याचं बाह्यस्वरूप समाजाच्या बनावट मापदंडांवर 'परफेक्ट' वाटत नाही — त्या माणसाने प्रेम करण्याचा विचारही करताना शंभरदा विचार करावा लागतो. कारण आज प्रेम म्हणजे समर्पण नाही, तर एक व्यवहार झाला आहे.
प्रेमाला आता सौंदर्य पाहिजे, पैसा पाहिजे, स्टेटस पाहिजे. आणि या हव्यासाच्या खेळात मनाची किंमत फारच कमी झाली आहे — इतकी की ते काही पैशांतही विकत घेता येईल असं वाटावं.
अपूर्ण शरीर असलेल्या माणसाने प्रेम केलं तर त्याच्या भावना कधी स्वीकारल्या जात नाहीत; उलट त्याला दयनीयतेची वागणूक दिली जाते. प्रेम करणं जिथं जगण्यासाठी ऊर्जा असायला हवी होती, तिथं ते अपमानाचं कारण ठरतं. हेच तर आपल्या समाजाचं सर्वात मोठं अपयश आहे.
प्रेमाची स्पर्धा
आज प्रेम म्हणजे स्पर्धा आहे —
कोणाचा पार्टनर जास्त सुंदर?
कोण जास्त श्रीमंत?
कोण Instagram वर परफेक्ट दिसतो?
या स्पर्धेत "मन" या शब्दाला स्थानच राहिलेलं नाही. शरीर आणि संपत्ती यांची नशा इतकी चढली आहे की प्रेमाचा गंधही हलकासा उरलेला नाही.
'आपण कोणाच्या प्रेमात पडलो' यापेक्षा 'आपण कोणाला दाखवू शकतो' याला महत्त्व आलं आहे.
मीपणा विरुद्ध आपलेपणा
पूर्वी प्रेमात 'आपण' होतं — "मी" नव्हे.
आज प्रत्येकजण स्वतःचा फायदा, स्वतःचं सुख, स्वतःची सोय पाहतो. प्रेम करणं म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणं होतं, आज ते स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचं साधन झालं आहे.
त्या अर्थाने अपूर्ण शरीर असलेल्या व्यक्तीला प्रेम करण्याची परवानगी आहेच, पण त्यांनी आधी स्वतःचं मन कवचकुंडलात जपायला हवं.
कारण प्रेम करताना सर्वांत मोठा धोका असतो — स्वतःलाच गमावण्याचा.
एकतर्फी प्रेमाचं सत्य
जर तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम करत असाल, तर ते नक्की करा.
पण या प्रेमाचं वजन इतकं स्वतःवरच ठेवा की, समोरच्याच्या नकारानेही तुमचं आयुष्य ढवळून न निघावं.
प्रेम स्वतःसाठी करा, स्वतःच्या भावनांचा आदर करा.
प्रेमात हरवून स्वतःला तोडणं, स्वतःचं मन मारणं — ह्याला प्रेम म्हणत नाहीत.
ज्याला तुमचं मन समजत नाही, तो तुमच्या शरीरालाही कधी समजणार नाही.
शरीर संपतं, भावना उरतात
शरीर सुंदर असो वा अपूर्ण, त्याचा प्रवास शेवटी मातीपर्यंतच असतो.
संपत्ती असो वा यश, ते देखील काही वर्षांनी परकं होतं.
पण प्रेमाच्या भावना जर खर्या असतील, तर त्या काळाच्या पुढे जाऊनही आपल्या आत जिवंत राहतात.
म्हणूनच आजच्या खोट्या प्रेमाच्या दुनियेत, जर अपूर्ण शरीरानेही कुणावर प्रेम केलं तर ते सगळ्या स्वार्थांपेक्षा मोठं आहे.
ते प्रेम स्वतःसाठी असावं.
निरपेक्ष, निखळ, आणि अश्रूंना समजून घेणारं असावं.
कारण शेवटी, प्रेमाने आपल्याला पूर्ण करायला हवं, तोडायला नव्हे.
#प्रेमाचंवास्तव #अपूर्णतेतीलसंपूर्णता #मनाचंमोल #स्वतःवरप्रेम #समाजआणिप्रेम #मराठीतूनमनोगत #मनाचा आवाज #खरंप्रेम #वास्तवदर्शीलेख #भावनांचीकिंमत #स्वतःचासन्मान
Comments
Post a Comment