नाती विरून जातात तेव्हा…!


लग्न म्हणजे दोन मनांचा मिलाफ, एकमेकांच्या सुख-दुःखाची साथ आणि अनोख्या प्रवासाची सुरुवात. पण जसजसं हे नातं पुढे जातं, तसतसं काहीतरी हरवत जातं… संवाद, प्रेम, आपुलकी, आणि कधी कधी एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीही.

आजच्या जगात अनेक जोडप्यांसमोर हाच प्रश्न आहे— नवऱ्याला वाटतं, "मी तिच्यासाठीच तर हे सगळं करतोय!" आणि बायकोला वाटतं, "मला नवराच नाहीये, फक्त जबाबदाऱ्या सांभाळणारा एक यंत्र आहे!" मग खरी चूक कोणाची? आणि यावर उपाय काय?

सोनाली आणि अमोल यांचं लग्न झालं तेव्हा सगळं छान होतं. स्वप्नांसारखं! प्रेम होतं, गप्पा होत्या, एकत्र वेळ घालवायची मजा होती. पण काही वर्षांनी जबाबदाऱ्या वाढल्या. सोनालीला मोठं घर हवं होतं, अमोलने कर्ज घेतलं. तिच्या गरजा पूर्ण करायच्या म्हणून तो जास्त वेळ काम करू लागला. ऑफिस, कमाई, EMI, भविष्याची चिंता— हेच त्याच्या आयुष्याचं गणित झालं.

दुसरीकडे, सोनालीला नवऱ्याचा वेळ हवा होता. ती अमोलशी बोलू पाहायची, पण तो नेहमीच दमलेला असायचा. तिला बाहेर फिरायचं असायचं, तो म्हणायचा, "आत्ता पैसे वाचवणं गरजेचं आहे!" तिला थोडं लाड, कौतुक, प्रेम हवं होतं, पण त्याच्याकडे त्यासाठी वेळच नव्हता. आणि मग… तिचं मन दुसऱ्या कुणाकडे तरी ओढलं गेलं.

अमोलच्या दृष्टीने तो काहीही चूक करत नव्हता. तो कष्ट करत होता, ती आनंदात राहावी म्हणून पैसा कमावत होता. पण सोनालीसाठी पैसा नव्हे, तर नवऱ्याचा सहवास महत्त्वाचा होता.

प्रश्न असा आहे की, चूक कोणाची?

अमोलने जर सोनालीला समजून घेतलं असतं, तिच्यासोबत वेळ घालवला असता, तर तिला भावनिक ओढ कुठेतरी दुसरीकडे जाण्याची गरजच भासली नसती.

पण सोनालीनेही हे समजून घ्यायला हवं होतं की अमोल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नव्हता. तो दोघांसाठीच कष्ट करत होता.

कधी नवऱ्याला वाटतं की "मी संसार चालवतोय", पण पत्नीला वाटतं "माझं मन कुठे हरवत चाललंय." आणि मग हळूहळू नात्यात दरी निर्माण होते.

समाजात असंख्य स्त्रिया अशाच आहेत ज्या नवऱ्याच्या वेळेच्या कमतरतेमुळे भावनिकदृष्ट्या कोरड्या पडतात. आणि अनेक पुरुष असे आहेत, जे कुटुंबासाठी एवढं झटतात की स्वतःची आणि पत्नीची मानसिकता समजून घ्यायला त्यांच्याकडे वेळच नसतो.

"लग्न म्हणजे केवळ जबाबदाऱ्या नाहीत, ती एक सुंदर जाणीव असते."

पण जर जबाबदाऱ्या आणि भावनिक गरजा यामध्ये समतोल राहिला नाही, तर नातं गमावतं

मग यावर उपाय काय?

1. संवाद वाढवा: नवरा आणि बायकोने दिवसातून किमान ३० मिनिटं एकत्र गप्पा मारायला हव्यात— फोन, टीव्ही, काम सगळं बाजूला ठेऊन!

2. भावनांचा सन्मान करा: नवऱ्याने बायकोच्या भावना ऐकल्या पाहिजेत, आणि बायकोनेही नवऱ्याच्या संघर्षाचा विचार करायला हवा.

3. सहवास महत्त्वाचा आहे: सुट्टीच्या दिवशी एकत्र वेळ घालवा. कधीतरी बाहेर फिरायला जा, जुन्या आठवणी जाग्या करा.

4. शारीरिक जवळीक विसरू नका: लग्न केवळ भावनिक नाही, तर शारीरिक नात्यानेही मजबूत राहतं. स्पर्श, मिठी, प्रेमळ संवाद— हे नातं घट्ट करतात.

जर नात्यात दुरावा आला असेल, तर त्यावर उपाय शोधणं महत्त्वाचं. बाहेरचं आकर्षण ही कायमची सोबत देऊ शकत नाही. पण जर नात्यात संवाद, प्रेम, आणि एकमेकांना समजून घेण्याची ताकद असेल, तर नातं अधिक घट्ट होऊ शकतं.

आणि हो… संसारात पैसा महत्त्वाचा असतो, पण केवळ पैसा पुरेसा नसतो. वेळ, संवाद आणि प्रेम यांची साथ असेल, त

रच नातं खरं अर्थाने सुखी होतं.

तर मग, समजून घ्याल ना, एकमेकांना?


Comments

Popular Posts