पैसा – प्रतिष्ठेचा तराजू


आयुष्य जगताना आपण अनेक गोष्टी अनुभवतो – प्रेम, मैत्री, संघर्ष, यश, अपयश... पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कायम अधोरेखित राहते – पैसा. पैसा हा केवळ चलन नाही, तो माणसाच्या अस्तित्वाचा मापदंड झाला आहे. कोणीतरी फार सुरेख म्हटलंय – "श्रीमंताच्या घरावर कावळा बसला, तरी तो मोर दिसतो... आणि गरीबाचं पोर उपाशी असलं तरी लोक त्याला चोर समजतात!" हेच वास्तव आहे आपल्या समाजाचं.

समाजाचा पैसा मोजणारा तराजू

आपण एखाद्या व्यक्तीकडे बघताना आधी त्याचं बोलणं, वागणं नव्हे, तर त्याची संपत्ती पाहतो. त्याने कोणते कपडे घातलेत, कोणती गाडी वापरतो, कुठल्या भागात राहतो, यावरून आपण त्याच्या प्रतिष्ठेचा अंदाज घेतो. गरीब माणूस कितीही प्रामाणिक असला, कष्टाळू असला तरी त्याच्याकडे पाहिलं जातं ते संशयाने.

गरीब असणं म्हणजे गुन्हा?

आपण समाज म्हणून गरीब व्यक्तींच्या हालअपेष्टांकडे बघायचं विसरलो आहोत. रस्त्यावर भिक मागणारा बघितला की आपण डोळे फिरवतो, पण त्याच रस्त्यावर एखादी आलिशान गाडी आली तर आपली नजर आपसूक वळते. का? कारण आपल्या मनात एक समीकरण तयार झालंय – "पैसा म्हणजे प्रतिष्ठा, पैसा म्हणजे सन्मान, आणि पैसा नसेल तर तू काहीच नाहीस!"

सिस्टीमच चुकीची आहे

शिक्षणाचा दर्जा, नोकऱ्यांचे संधी, आरोग्यसेवा – सगळंच आज पैशावर अवलंबून आहे. गरीब माणसाला चांगलं शिक्षण मिळावं, त्याला आरोग्याची सेवा मिळावी, त्याच्या मुलाला संधी मिळावी यासाठी काही खास व्यवस्था नाही. पैसा असेल तर अपंगही आयुष्य जगतो, आणि नसेल तर संपूर्ण शरीरसंपन्न माणूसही हतबल होतो.

श्रीमंतांचे चुकंही योगायोग आणि गरीबाचं बरोबरही गुन्हा!

जेव्हा एखादा श्रीमंत माणूस गुन्हा करतो तेव्हा त्याला "चुकून" असं झालं म्हणत सोडलं जातं. पण एखादा गरीब कुठे किरकोळ चुकीच्या ठिकाणी दिसला, तरी त्याच्यावर संशय घेतला जातो. आपण विचार केलाय का, की कायदाही पैशावरच वाकतो? वकिल, सुनावणी, बेल – हे सगळं पैसेवाल्यांना मिळतं. गरीब माणसाची कथा, तक्रार, न्याय – सगळं दाबून टाकलं जातं.

बदल घडवायचा असेल, तर मन बदलावं लागेल

हा लेख केवळ तक्रार नाही, तर एक साद आहे विचारांची. आपण समाज म्हणून पैसा हा माणूस मोजण्याचा निकष बनवतो, तो बदलायला हवा. प्रत्येक माणसात काही तरी चांगलं असतं. प्रत्येक गरीब चोर नसतो आणि प्रत्येक श्रीमंत सज्जनही नसतो.

जेवढं आपण दुसऱ्याच्या श्रीमंतीला दाद देतो, तेवढंच त्याच्या माणुसकीलाही द्यायला हवं.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं...

“माणसाचा दर्जा त्याच्या खिशावरून नाही, तर त्याच्या मनावरून ठरवायला हवा!”

Comments

Popular Posts