सांभाळणाऱ्या स्त्रीची किंमत
स्त्री... एक शब्द, पण त्यामागे कितीतरी भूमिका, जबाबदाऱ्या आणि भावना दडलेल्या असतात. आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, सून... आणि या सगळ्यात एक गोष्ट समान असते सांभाळणं.
समाजात अनेकदा आपण अशा गोष्टी ऐकतो "ती फार समजूतदार आहे", "तिनं सगळ्यांना सांभाळलं", "ती होती म्हणून घर टिकून राहिलं"... पण प्रश्न असा आहे की, किती वेळा आपण त्या 'सांभाळणं' या भूमिकेची किंमत ओळखतो?
एका स्त्रीचं आयुष्य हे फक्त तिचं नसतं. लग्न झाल्यावर तिचं आयुष्य पतीच्या, सासरच्या, मुलांच्या, घरच्यांच्या गरजांमध्ये विरघळतं. ती स्वतःसाठी किती वेळ जगते? किती वेळ ती स्वतःला विचारते "माझं काय?"
सतत समजूतदारपणाचा मुखवटा घालणं, कुणाच्याही मनात राग न येऊ देणं, समोरच्याची चूक असूनही गप्प राहणं हीच जर 'चांगली स्त्री'ची व्याख्या असेल, तर आपण सगळेच तिला मानसिक तुरुंगातच ठेवत आहोत.
तिला कोणी समजून घेत नाही... पण जेव्हा तिच्या धीराचं झाड मोडतं, तेव्हा म्हणतात "ती बदलली", "ती आता आधीसारखी राहिली नाही". खरंतर ती फक्त थकली असते.
ती फसवायला आलेली नसते. ती सांभाळायला आलेली असते.
पण प्रश्न असा आहे आपण तिचं सांभाळणं किती वेळा समजून घेतो, आणि किती वेळा गृहित धरतो?
एक वेळ येते जेव्हा ती फक्त हसत राहते, पण डोळ्यांमध्ये रिकामी शांतता असते. एक वेळ येते जेव्हा तिचं बोलणं थांबतं, पण तिचा संघर्ष सुरुच असतो. तिचं सगळं 'मीपण' झिजतं घर जपताना, नातं जपताना, आणि स्वतःला हरवताना.
#वास्तवदर्शीलेख #मनाचीखंत #स्त्रीचीकिंमत #सांभाळणं_ही_शक्ती #नात्यांचा_आरसा #मराठीभावना #जीवनाचं_भान
Comments
Post a Comment