माणसं शेवटी माणसांसाठीच हवी असतात...
आयुष्याच्या सुरुवातीला आपण ज्या गोष्टींचा पाठपुरावा करतो, त्यात पैसा, प्रतिष्ठा, यश, प्रगती यांचा समावेश असतो. आपण धावत राहतो, रात्रंदिवस झगडतो... पण या धावपळीत नकळतपणे आपण माणसं गमावत जातो. "थोडं वेळ नंतर बोलतो", "आता वेळ नाही", "मिटिंग आहे", "थोडं काम उरकतो" हे बोलताना आपण ज्या माणसांना दुर्लक्षित करतो तेच शेवटी आपल्या आयुष्यातील खऱ्या संपत्तीचा भाग असतात.
एक वय येतं… जेव्हा शरीर थकलेलं असतं, डोळ्यांवर चष्मा असतो, चालायला आधार हवा असतो, आणि फोन वाजतो तरी उचलणारं कोणी नसतं. कारण आपणच ती माणसं कधीच आपल्यापासून दूर केली असतात.
पैसा…?
हो, गरजेचा आहेच. पण शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं हात धरायला, तुमचं पाणी द्यायला, डोळ्यांत पाहून "तुम्ही आहात ना... एवढं पुरेसं आहे" असं म्हणायला, पैसा कधीच पुढे येत नाही.
येतात ती आपण जपलेली माणसं आपले आई-वडील, पत्नी-पती, मुलं, सख्खे मित्र.
आपण एखाद्या घरात गेल्यावर एखादा म्हातारा कोपऱ्यात खिडकीजवळ बसलेला दिसतो…
कधी खिडकीतून बाहेर बघतो, कधी आपले हातपाय चोळतो, कधी निवांतपणे डोळे मिटतो.
तेव्हा त्या डोळ्यांत अनेक प्रश्न असतात…
"माझं आयुष्य भरभरून जगलो, पण शेवटी इतकंच का उरलं? कुठे गेले माझे लोक?"
उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाकडे असतं.
आजपासून आपण पैसा कमवायचा हवाच, पण त्याचबरोबर माणसं जोडायला, वेळ द्यायला आणि प्रेमानं कोणीतरी आपलं आहे हे जाणवून द्यायलाही शिकायला हवं.
कारण "शेवटी आयुष्य जगण्यासारखं तेव्हाच वाटतं, जेव्हा आपल्या आजूबाजूला आपली माणसं असतात..."
#वास्तवदर्शीलेख #जीवनअंतरंग #संबंध #माणसांचंमहत्त्व #मराठीलेख #भावनिकलेख #समाजआरसा #ManasVichar #MarathiReality #जिवनाचे_शेवटचे_पान
Comments
Post a Comment