जीवन संपतं नाही... पण नातं हरवतं!
"संसार" ही एक अशी मखमली कल्पना आहे, जिच्या शिवणीत प्रेमाचं धागं, जबाबदारीचा धागा, आणि समजुतीचा धागा वापरला जातो. पण आजकाल या शिवणीतला एक धागा हळूहळू गळून पडतोय तो म्हणजे संवादाचा.
संध्याकाळी ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर दरवाजा उघडतो, समोर बसलेली ती, मोबाईलमध्ये गुंतलेली.
मी विचारतो "आज काय जेवायला आहे?"
ती म्हणते "फ्रिजमध्ये आहे, गरम कर."
मी गप्प. तीही गप्प. आमच्या दोघांत आता संवाद राहिलाय फक्त "गरजांचा".
कधी काळी जे बोलणं संपायचं नव्हतं, ते आता "बोलणं टाळण्याकडे" झुकलंय.
मुलगा आठवीत आहे. त्यालाही कधी फोनवर पाहतो मी बोलतो, तो "हं" म्हणतो. इतकंच.
काय झालंय आपल्याला?
इतकं काही मिळवलं फ्लॅट, गाडी, नोकरी, सुट्ट्यांमध्ये टूर पण "संपर्क" हरवला.
ज्याच्यासाठी आपण हे सगळं करत होतो, त्या माणसांशी आता नजरेनेही संपर्क राहत नाही.
एके दिवशी ती म्हणाली "आपण बोलतच नाही आता."
मी म्हणालो "वेळच मिळत नाही."
ती हसली "वेळ मिळवायचा असतो, मिळत नाही."
ते वाक्य काळजावर कोरलं गेलं.
दुसऱ्या दिवशी मी घरी लवकर आलो. मुलाला हॉलमध्ये बोलावलं.
ती आमच्यासाठी चहा घेऊन आली.
मी दोघांच्या कपात चहा ओतला, म्हणालो "आज तीनजण एकत्र बसूया. काही न बोलता फक्त बसूया."
ती हसली, मुलगा गोंधळला... पण त्या दिवशी जे "शब्द न बोलता" बोललं गेलं, ते कदाचित हजारो शब्दांपेक्षा जास्त होतं.
आयुष्य हे एकट्याचं नसतं, ते संगतीचं असतं.
आज आयुष्य "फॉरवर्ड" चाललंय, पण नातं मागे राहिलंय.
आयुष्य बदललंच आहे पण त्यातल्या माणसांना विसरता कामा नये.
घराचं कर्ज फेडताना, नात्यांचा व्याज दर चुकवू नका.
म्हणूनच आजपासून एक ठरवा
मोबाईल बाजूला ठेवा.
फक्त पाच मिनिटं, पण ती एकमेकांसाठी ठेवा.
पुन्हा एकदा, नव्याने संवाद सुरु करा.
कारण तुम्ही ऑफिससाठी replaceable आहात पण नात्यासाठी "unmatchable" आहात!
#वास्तवदर्शीकथा #आयुष्याचे_सत्य #नात्यांची_किंमत
#RealLifeMarathi #सांभाळा_नाती #जरा_थांब_विचार_कर
#मराठीभावना #मराठीलेख #समाजाचा_आरसा #EmotionalTruths
Comments
Post a Comment