नुकसानीची तुलना आणि मनाचं मौन

"माणूस त्याच्या स्वभावावरून ओळखला जातो" ही म्हण आता केवळ पुस्तकात राहिलीय, कारण समाजात आज स्वभावापेक्षा स्वार्थ अधिक स्पष्टपणे दिसतो. आपल्यावर वाईट प्रसंग ओढवले, नुकसान झालं, स्वप्नं गळून गेली हे एकट्यानं झेलणं फार अवघड असतं. पण हेच नुकसान जर "सगळ्यांचंच" होतंय असं वाटलं, तर त्याला दु:ख होत नाही, उलट एक अघोषित समाधान मिळतं.

हे केवळ वैयक्तिक नात्यांमध्येच नव्हे तर सामाजिक स्तरावरही दिसतं एखाद्याचं घर बुडालं तर ती "दुर्दैवाची" गोष्ट असते, पण जर संपूर्ण कॉलनी पाण्याखाली गेली तर ती एक "नैसर्गिक आपत्ती" ठरते. माणसाच्या मनाने आपलं दु:ख हलकं वाटावं म्हणून इतरांच्या दुःखात पळवाट शोधली जाते.

कधी कधी वाटतं की आपण चुकीच्या वाटेवर चाललोय. आयुष्यात काही निर्णय चुकीचे घेतले. पण मागे वळून पाहिलं की लक्षात येतं आपण एकटे नाही आहोत. आपल्या सारखंच गोंधळलेले, अपयशी, हरवलेले लोक हजारोंच्या संख्येनं चाललेत. आणि तेच आपल्या चुकीचं बरोबर वाटू लागतं.

खरं संकट इथेच आहे जेव्हा चुकीचं वागणं सर्वसामान्य होतं, तेव्हा ते समाजाच्या आचरणात मिसळतं.

तिथेच मानवी मनाचं एक विशेष ‘कंडीशनिंग’ सुरू होतं तुलना करून दु:ख मोजणं.
"माझंच घर मोडलंय का? नाही, शेजारच्याचंही मोडलंय. मग चालेल…"
हे 'चालेल' म्हणताना एक क्षण स्वतःबद्दल अपराधी वाटतं, पण त्यातच हळूहळू मनाला शांत करणारी क्रूर सवय तयार होते.

या मानसिकतेमुळेच आपण इतरांच्या दु:खाकडे 'स्वतःच्या' दु:खाची किनार लावून पाहतो. सहवेदना नाही, तर केवळ स्वतःचं दु:ख अल्प वाटावं म्हणून दुसऱ्याच्या दु:खाचा आधार घेतो. हे मानसिकतेचं अपघातात्मक वास्तव आहे.

या सगळ्यात एक गोष्ट हरवते "मनाचं खरेपण."
मन आता शुद्ध दुःखही मनापासून जगत नाही. ते मोजतं "त्याला किती झालंय? मला किती झालंय?"
त्या मोजमापात भावनांचा गळा दाबला जातो. सहानुभूतीपेक्षा तुलना मोठी ठरते.

#वास्तवदर्शी #मराठीलेख #मनाचंराजकारण #दुखाआणिसमाज #स्वभावओळख #मानसिकस्वास्थ्य #मराठीविचार #मनोगत #समाजआरसा #खरंजीवन

Comments

Popular Posts