शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी
गावातला एक सामान्य शेतकरी…
ज्याच्या खांद्यावर कुटुंबाची, शेतीची, कर्जाची, पिकाच्या जोखमीची आणि सामाजिक प्रतिष्ठेची जबाबदारी असते.
तो माणूस केवळ शेती करत नाही
तो आईचा मुलगा असतो, बायकोचा नवरा असतो, लेकरांचा बाबा असतो, वडिलांचा आधार असतो, गावाचा शेजारी असतो.
पण जेव्हा कर्ज, तगादा, सावकार, पिकांचे नुकसान, वादळ, दुष्काळ, कधी विम्याचा मोबदला नाही, बँकेच्या नोटिसा…
या सगळ्याचा अदृश्य दाब त्या माणसावर येतो, तेव्हा तो आतून मोडत जातो.
त्याचे हसू हरवते, त्याचा आत्मविश्वास हरवतो.
तो स्वतःच्या घरातल्या माणसांपुढेही आपले दुःख बोलू शकत नाही.
फक्त रडतो… लपून रडतो…
आणि अखेरीस, फाशी, विष, रेल्वेखाली – अशा मार्गांनी आपला जीव संपवतो.
लेक सांगते तेव्हा – काळीज फाटतं
फाशी घेतलेल्या बापाला पाहून,
त्याची लहानशी मुलगी रडत रडत सांगते
“त्यांना पैशासाठी सारखे फोन यायचे, ते आमच्यासमोर रडायचे, पण काही बोलत नव्हते…
आता कुणाच्या गाडीचा आवाज आला की वाटतं पप्पाच आलेत…”
हे ऐकून मन गोठून जातं.
ही केवळ एक मुलगी नाही
ती आज हजारो शेतकऱ्यांच्या मुलांच्या वेदनांचा प्रतिनिधी आहे.
कर्ज – एक अदृश्य फास
कोणतीच बँक किंवा सावकार थेट जीव घेत नाही.
पण त्यांच्या नोटिसा, फोन, धमक्या,
यामुळे शेतकऱ्यांच्या मनावर भीतीचं, अपराधीपणाचं सावट येतं.
आपण अपयशी झालो, आपण जगू नये
ही भावना त्यांच्या मेंदूवर हल्ला करते.
पण खरी गोष्ट अशी आहे की
नेते, उद्योगपती हजारो कोटींची कर्जं घेतात, त्यांना माफही होतात, ते पुन्हा उभे राहतात.
पण अल्पभूधारक शेतकरी मात्र अपराधीपणाने गळफास घेतो.
लेकरांच्या डोळ्यातील प्रश्न
शेतकऱ्यांनो,
तुमच्या जाण्याने कर्ज सुटणार नाही,
पण लेकरांच्या आयुष्याला न संपणारा अंधार मिळणार आहे.
तुमच्या पश्चात बायको, मुलं, आई-वडील –
तेच सावकारांचे फोन ऐकतील,
तेच सामाजिक तिरस्कार सहन करतील.
तुम्ही पळून गेला, पण त्यांना आयुष्यभराचा त्रास देऊन गेला.
सरकार आणि समाज
सरकारने मोठमोठ्या योजना आणल्या
कर्जमाफी, पीकविमा, आर्थिक सहाय्य.
पण खरे शेतकरी अजूनही तगाद्याच्या विळख्यात आहेत.
सहाय्य वेळेत मिळत नाही,
नीती चांगल्या आहेत पण पोहोच कागदावरच राहते.
गावातील लोकही अशा कुटुंबांना वाळीत टाकतात,
त्यांना दोष देतात, तर कधी हळहळ व्यक्त करतात.
पण मुळ समस्या सोडवायला कुणी उभं राहत नाही.
उपाय – समाजाने घ्यायची जबाबदारी
1. आर्थिक मदत व सल्ला केंद्रे:
– गावात शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर व आर्थिक मार्गदर्शन मिळायला हवं.
2. मानसिक आरोग्य सेवा:
– शेतकऱ्यांसाठी समुपदेशन, हेल्पलाइन आणि ताणतणाव नियंत्रण कार्यक्रम सुरू व्हावेत.
3. सामाजिक आधार:
– गावाने अशा कुटुंबांना वाळीत न टाकता आधार द्यायला हवा.
4. वेळेवर विमा व कर्जमाफी:
– शासनाने किमान तातडीने रक्कम खात्यात जमा करावी.
लेखकाची हाक
मायबाप शेतकऱ्यांनो,
जीवन संपवणं हा मार्ग नाही.
कर्जाचं ओझं एकत्रित उचलता येतं,
पण लेकरांच्या डोळ्यांतील अश्रू तुम्ही पुसू शकत नाही.
तुम्हीच त्यांच्या आशेचा, आधाराचा कणा आहात.
जगण्यासाठी लढा,
पण जग सोडण्याचा विचार करू नका.
सरकार व समाज
ही केवळ आकडेवारी नाही,
ही प्रत्येक आकड्यामागची जिवंत कहाणी आहे.
ही कहाणी बदलायची जबाबदारी तुमच्यावर आहे.
#शेतकऱ्यांचीकाळजी #आत्महत्याथांबवा #सरकारनेजागावे #समाजाचाआरसा #लेकरांचीदु:खं #कर्जाचाविळखा #मानसिकआरोग्य #शेतकऱ्यांचाआधार #शेतीवाचवा #कुटुंबवाचवा
Comments
Post a Comment