आधुनिकता की आंधळेपणा?

आज स्त्रियांना मोकळीक मिळाली आहे, हे खरे आहे. शिक्षण, नोकरी, स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद, आयुष्य आपल्या अटींवर जगण्याची क्षमता हे सर्व आजच्या काळात सहज शक्य झालंय. ही नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे.

पण या स्वातंत्र्याचा अर्थ अनेकांनी चुकीचा लावला आहे. "मी फ्री आहे" म्हणजे "मी हवं ते कपडे घालू शकते", "मी हवं तसं वागू शकते" हे खरं असलं तरी त्याचा गैरफायदा घेतला तर तो स्वातंत्र्य राहत नाही, तर आंधळेपणा ठरतो.

खरी आधुनिकता म्हणजे अंगप्रदर्शन किंवा लाइक्ससाठी झगमगाट नव्हे. खरी आधुनिकता म्हणजे आपल्या निर्णयांची जबाबदारी घेणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, आणि आपल्या कृतीमुळे कुटुंब आणि समाजाच्या नजरेत आदर मिळवणं.
कपड्यांनी नाही, तर विचारांनी आधुनिक व्हा कारण शरीर क्षणभंगुर आहे, पण विचार कायमचे ठसतात.

आज सोशल मीडियावर आपण पाहतो की स्वतःला "हॉट" दाखवण्याची स्पर्धा सुरु आहे. काहीजणी समजतात की अशा प्रकारे लक्ष वेधलं तर आपण आधुनिक आहोत. पण प्रत्यक्षात लोक तुमच्या अंगावर नाही, तुमच्या बुद्धीवर, वागणुकीवर, जबाबदारीवर विश्वास ठेवतात.
तुमचं शरीर उद्या बदलणार आहे, पण तुमची ओळख, तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमची किंमत ती कायम राहते. मग का आपण तात्पुरत्या टाळ्यांसाठी कायमचा आदर गमवायचा?

आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून, आजी या प्रत्येक भूमिकेला समाजात मान आहे. त्या मानाचं वजन केवळ नात्यात नसतं, तर तुम्ही स्वतःला कसं सादर करता यातही असतं. तुमच्या कृतीमुळे जर तुमच्या लेकरांना, तुमच्या घराला लाज वाटली, तर ते स्वातंत्र्य नाही, ती अधोगती आहे.

खरं स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला जपणं, स्वतःच्या आवडी जगणं, समाजासाठी काही करणं, स्वतःला सतत उन्नत करणं. स्त्री जेव्हा स्वतःला "प्रेरणा" बनवते, तेव्हा ती केवळ स्वतःच नाही तर पिढ्यांना बदलते.

#आधुनिकता #स्वातंत्र्य #समाजआरसा #मराठीवास्तव #सन्मानानेजगा #आयुष्य #स्त्रीशक्ती #आत्मसन्मान

Comments

Popular Posts