नातं, पैसा आणि तडजोड
आजच्या काळात लग्न हे दोन माणसांचं नव्हे तर दोन कुटुंबांचं बंधन आहे. पण दुर्दैवाने, आज नात्यांच्या मुळाशी पैसा, सोय आणि प्रतिष्ठा या गोष्टी घट्ट बसलेल्या दिसतात.
आज मुलगा किती चांगल्या स्वभावाचा आहे, किती जबाबदार आहे, आईवडिलांना कसा सांभाळतो, समाजात कसं वागतो या गोष्टींना फारसं महत्त्व दिलं जात नाही. महत्त्व दिलं जातं तेवढंच त्याचं पगार किती आहे? घर किती मोठं आहे? कार आहे का? सुखसोयी आहेत का?
परिणामी, एखादा गरीब पण चांगल्या स्वभावाचा, कष्टाळू मुलगा मुलीसाठी नाकारला जातो. आणि नंतरचं आयुष्य पैशाने श्रीमंत पण वागणुकीने गरीब अशा घरात जातं.
लग्नानंतर मुलगी नवीन घरात जाते. तिच्यासाठी घरातले लोक नवीन असतात. सुरुवातीला घरच्यांनीही आणि मुलीनेही एकमेकांना जुळवून घ्यावं लागतं. पण आजच्या पिढीत एक मोठी समस्या दिसते —
👉 "मीच का बदलू?"
👉 "मी का तडजोड करू?"
हा प्रश्न मुलींच्या मनात येतो, पण तितकाच प्रश्न मुलांच्या आणि घरच्यांच्या मनातही आहे.
नातं म्हणजे थोडं तुझं, थोडं माझं. पण आता नातं म्हणजे "फक्त माझं" असं झालं आहे.
आज तडजोडीचा अभाव, पैशाचं अंधळं महत्त्व आणि स्वकेंद्री विचार या सगळ्यांमुळे घटस्फोटाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. खरं तर नातं टिकवायचं असेल तर अहंकार सोडावा लागतो, थोडं वाकावं लागतं. पण आताच्या काळात वाकण्याची तयारी दोन्ही बाजूंनी कमी झाली आहे.
शिक्षण, पैसा, करिअर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे माणूसपण.
– जो मुलगा/मुलगी नातं जपतो,
– कुटुंबाला आधार देतो,
– चांगले मूल्य जपतो,
त्याची किंमत पैशापेक्षा मोठी असते. पण समाज मात्र ही किंमत ओळखायला तयार नाही.
पूर्वी नाती टिकवण्यासाठी लोकांनी जास्त तडजोड केली. आजची पिढी उलट "माझ्या मर्जीप्रमाणे नसेल तर मी नाही" या विचाराने जगते. दुर्दैवाने, या पिढीचा प्रभाव पूर्वीच्या पिढीवरही होतोय. "त्यांनी नाही बदललं तर आपण का बदलायचं?" असं म्हणत वडीलधारी मंडळीही हट्टी होत आहेत. आणि यामुळे घरांमधली ऊब, आपुलकी हळूहळू हरवत चालली आहे.
नातं टिकवायचं असेल तर पैसा पुरेसा नाही. बदल, तडजोड, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान ही नात्यांची खरी पायाभरणी आहे.
लग्न म्हणजे एकत्र प्रवास. आणि एकत्र प्रवासात कधी तू पुढे, कधी मी मागे, कधी मी पुढे, कधी तू मागे असं संतुलन असलं पाहिजे. फक्त पैशाच्या तराजूत माणसं तोलली गेली, तर आयुष्य रिकामं आणि नातं अधुरं राहतं.
#लग्न #तडजोड #समाजआरसा #पैशाकिंमत #नात्यांचीसत्यता #मराठीलेख #वास्तवदर्शी #संबंध #आधुनिकपिढी
Comments
Post a Comment