आपण माणूस राहिलोय का… की फक्त कमाईची मशीन?

आपल्या आजूबाजूला बघा…
प्रत्येक जण धावतच आहे
कुणासाठी? कशासाठी? कुणाला माहित नाही.

पैशाच्या मागे लागलेलं आयुष्य म्हणजे एखादी पिंजऱ्यातली चिमणी…
उडायचं स्वातंत्र्य असतं पण उडायला वेळ नसतो.

घरात पैसे येतात, पण
घरभर शांतता पसरते…
बोलणं कमी, मोबाइल जास्त.
नाती ताणलेली, संवाद कापलेला,
आणि चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी हरवलेला.

लोक म्हणतात
"पैसा आला की सगळं येतं."

पण खरंच येतं का?

आजारी बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसायला
पैसा पुढे होतो का?

खांदा शोधत रडणाऱ्या मुलीचे अश्रू
कागदी नोटा पुसतात का?

समोर उभ्या माणसाचा जीव जाताना
पैसा म्हणतो का,
“थांब… मी आहे ना… मरू नकोस” ?

नाही ना?

मग आपल्या अहंकाराला इतकं मोठं का करू?
आपण कमावलेल्या रुपयाचं वजन
आपल्या माणुसकीपेक्षा जास्त कसं होऊ देतो?

आपल्याकडचं जग असं झालंय
गाडीच्या दरवाजाला खरचटलं तर ओरडतो,
पण एखाद्याच्या मनाला लागलं तर
“सॉरी” देणंही जड जातं.

रस्त्यावर पडलेल्या माणसाकडे
लोक पहिल्यांदा फोन काढतात
व्हिडिओ शूट करण्यासाठी…
त्याला उठवण्यासाठी नाही.

कुणी गरीब दिसला की
कुणी आजारी दिसला की
कुणी वेदनेत दिसला की
लोक मागे हटतात…
दूर उभं राहून बघत राहतात.

कसं झालं आपल्याला?
कधी झालं?
कुणी शिकवलं असं वागायला?

आपण एवढे कठोर कसे झालो?

ज्या देशात
“अतिथी देवो भव” म्हणतात,
तिथे आता
“मला काय?” म्हणणारे लोक जास्त झालेत.

खरं सांगा…
रात्री झोपताना कधी विचार येतो का?

आज दिवसभरात
मी कुणाला हसवलं?
कुणाचा हात धरला?
कुणी दुखावला?
कुणाला मदत केली?

किंवा फक्त कमाई-काम-कामगिरी
यांच्यामध्येच दिवस अडकलाय?

आपण वस्तू वाढवतोय…
पण माणसं कमी करतोय.

मोठे फोन घेतो,
पण छोट्या छोट्या गोष्टींकडे डोळे मिटतो.

मोठी घरे घेतो,
पण घरातली माणसं दूर जातात.

मोठी स्वप्नं बघतो,
पण छोट्या नात्यांची कदर हरवतो.

अरे…
शेवटी राहणार तरी काय?

आपण दिलेला आदर,
आपलं चांगुलपण,
आपल्या हातून झालेली एक छोटी मदत…

हीच तर माणसाची खरी श्रीमंती.

बाकी सर्व
नंबर, नोटा, बँक बॅलन्स
हे सगळं तर आयुष्याच्या शेवटी
कागदाच्या चिऱ्याएवढंही महत्त्वाचं नसतं.

किमान एवढं तरी लक्षात ठेवा

पैसा कमवा…
पण त्यात माणूसपणा गुंतवायला विसरू नका.

Comments

Popular Posts