मुली सुरक्षित नाहीत… आणि समाज अजूनही शांत आहे हीच सर्वात मोठी भीती.

आजकाल लोक म्हणतात
“मुलींना शिकवा, धडा द्या, स्वसंरक्षण शिकवा…”

पण कुणी विचारत नाही
मुलींनी किती शिकायचं?
आणि समाजाने किती बरं माणूस व्हायचं?

आज परिस्थिती अशी झालीये की
आई-बाप मुलीला शाळेत सोडतानाही
मनात धडधड असते.

बसमध्ये बसताना चिंता,
वर्गात नेऊन ठेवतानाच भीती,
आणि घरी येईपर्यंत
हृदयाला ठोके अनियंत्रित.

कुठे सुरक्षित आहे मुलगी?
शाळा?
आंगणवाडी?
खेळाची मैदाने?
नातेवाईकांचं घर?
सोसायटीची लिफ्ट?
की रस्त्यावरची गर्दी?

उत्तर फक्त एकच कुठेच नाही.

ही भीती मुलींसाठी नाही…

ही भीती समाजाच्या सडलेल्या मानसिकतेसाठी आहे.

नराधम, विकृतीग्रस्त, मानवतेचा चोथा केलेले माणूस-पणाला कलंक असलेले लोक…
हे लोक कुठे असतात?
शाळेतल्या स्टाफ रूममध्ये,
सोसायटीच्या पार्किंगमध्ये,
कोपऱ्यावरच्या दुकानात,
किंवा नातेवाईकांच्या चेहऱ्यात लपलेले.

हो, कटू आहे पण सत्य आहे.
सगळे धोके रस्त्यावर नसतात,
बरंच धोका घराच्या चार भिंतींमध्येच असतो.

या ४–५ वर्षांच्या चिमुकल्या मुलींना
काहीच माहिती नसतं
चांगलं काय, वाईट काय…
धोका काय, विश्वास कोणाचा…
तिला फक्त माणसं दिसतात, विविध चेहरे दिसतात.

पण विकृतीचे डोळे
त्या निरागसतेला ‘शिकार’ म्हणून पाहतात.

काय चूक असते त्या चिमुकल्या जीवाची?

फक्त एकच ती मुलगी म्हणून जन्मलेली असते.

जन्मताच तिला शिकवलं जातं:
“बाहेर जाऊ नकोस…
अंधारात फिरू नकोस…
कोणावर विश्वास ठेवू नकोस…”

का बरं?
कारण समाज विकृत आहे?
की आपण असुरक्षिततेला संस्कृती मानतोय?

आई म्हणते
“बाळा, कुणाच्या हातात हात देऊ नकोस…”
बाप म्हणतो
“शाळेतून थेट घरी ये…”

हे त्यांना शिकवणं नाही,
ही त्यांची लक्तरं वाऱ्यावर टाकलेली भीती आहे.

व्यवस्था कोणाला वाचवते?

पीडितेला की आरोपीला?

पोलिस चौकशी,
वैद्यकीय तपासण्या,
शहरातील चर्चा,
न्यूज चॅनलची TRP,
आणि आरोपीसाठी
मानसिक सुसूत्रता, कोर्टाची तारीख, वकीलांची सर्कस…

आणि पीडिता?
तिच्या आईच्या हातात काय उरतं?
एक छोट्याशा बाळाचा फोटो…
एक चिमुकले कपडे…
आणि उरलेलं आयुष्यभराचं रिकामेपण.

न्याय?
तो मिळत नाही…
किंवा खूप उशिरा मिळतो…
किंवा रिपोर्टच्या ढिगाऱ्यात दडपतो.

सरकार?
एक स्टेटमेंट देतं,
एक ट्वीट करतं,
एक आश्वासन देतं…
आणि नंतर सर्व विसरून जातं
जोपर्यंत नवीन घटना होऊन त्यांच्या टेबलवर नाही येत.

सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे समाजाची सवय

विसरण्याची सवय.

एका दिवशी घटना घडते.
दुसऱ्या दिवशी मोर्चा निघतो.
तिसऱ्या दिवशी हॅशटॅग ट्रेंड होतो.
आणि चौथ्या दिवशी?
आपण परत आपल्या जीवनात.

मुलांच्या सुरक्षेची चर्चा संपते.
आघात मात्र पीडित कुटुंबावर कायमचा
जखमा भरत नाहीत,
रात्र संपत नाही,
आणि जीवन कधीच पूर्वीसारखं राहात नाही.

मुलींना शिकवण्यापेक्षा ‘मुलांना माणूस’ बनवण्याची वेळ आली आहे.

सुरक्षा कवच मुलींच्या आसपास नाही,
तो असायला हवा पुरुषांच्या मनात.

ज्या समाजात
आई, बहीण, पत्नी, मुलगी
ही फक्त नाती आहेत,
पण स्त्रीचा ‘मानवी अस्तित्व’ पाहायला कुणाला वेळ नाही…
त्या समाजाचा पाया आधीच कोसळलाय.

मुलींना शिकवणं आता पुरेसं नाही;
मुलांना संस्कार देणं आवश्यक आहे.

शेवटची हाक

जतन करा मुलींचं नाही,
तर समाजाचं माणुसकीतलं अस्तित्व.

जो समाज आपल्या सर्वात कमजोर घटकाला
(लहान मुलगी)
सुरक्षित ठेवू शकत नाही,
तो कितीही विकसीत झालाय असा दावा करू दे,
तो आतून सडलेलाच असतो.

काय चाललंय हे?
कधी थांबणार?
कधी जाग येणार?

सरकारचे कायदे पुलांसारखे आहेत
कागदावर भक्कम,
प्रत्यक्षात ढासळलेले.

जोपर्यंत आरोपीला
भीती नाही वाटत,
तोपर्यंत मुलींना
सुरक्षा नाही मिळणार.

Comments

Popular Posts