प्रेम नाही बदललं… लोकांच्या मनांचा स्वभाव बदललाय

आजकाल अनेकांना असं वाटतं
“आता पुरे… पुन्हा प्रेम करायचंच नाही.”
पण खरं सांगायचं तर, प्रेमाविरुद्ध राग नसतो…
राग असतो त्या व्यक्तीविरुद्ध ज्यांनी प्रेमाचं महत्त्व कमी करून टाकलंय.

प्रेम अजूनही तसंच आहे
शांत, स्थिर, सावरून घेणारं.
बदललं आहे फक्त लोकांचं वागणं आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

आज लोक नातं शोधतात, पण नाती सांभाळत नाहीत.

नात्यात तुटकपणा प्रेमामुळे येत नाही,
तो येतो सोयी आणि स्वार्थामुळे.

हल्ली लोकांना सगळं हवं
काळजी हवी, लक्ष हवं, आधार हवा.
पण स्वतःकडून त्याचं देणं मात्र कठीण वाटतं.

कधी दिसलंय?
आपण मनापासून देतो, समोरचा सहज घेतो.
आपण जपतो, समोरचा वापरतो.
आपल्याला नातं हवं असतं…
समोरच्याला फक्त आपलं “presence” हवं असतं.

आणि मग नातं जेंव्हा कोसळतं,
तेव्हा दोष प्रेमावर टाकला जातो.

पण प्रेमात काहीच दोष नसतो
दोष निवडीत असतो.

घर बदललं, काळ बदलला… पण लोकांची अपेक्षा अजूनही जुन्या पद्धतीची.

आज स्त्री-पुरुष दोघेही नोकरी करतात, धावपळ करतात, ताण घेतात.
तरीही नात्यातील जबाबदारी जास्त करून स्त्रीच्याच बाजूला ढकलली जाते

घर स्वच्छ नाही?
चूक तुझी.
मुलं नीट नाही?
चूक तुझी.
नाते टिकत नाही?
चूक तुझी.

जणू नातं हे दोघांचं नसून,
एकाच व्यक्तीचं ‘ड्युटी चार्ट’ आहे.

पुरुषही तणावात असतात,
त्यांचीही धावपळ असते,
पण त्यांना भावना व्यक्त करायला जागाच नसते.

दोघेही थकलेले, कापलेले, ओढलेले…
आणि तरीही समाजाची अपेक्षा
“नातं टिकवा.”

कसा टिकेल?
जेव्हा मनांना विसावा नाही,
आणि शब्दांना दिशा नाही.

पालकांकडूनही अपेक्षा वाढल्या… पण मदत अर्धी.

लग्न करा.
घर घ्या.
मुलं करा.
सगळं सांभाळा.

असं सांगणारेच लोक
खरं पाठबळ देताना मागे हटतात.

तरुण जोडपं ताणाखाली ताण घेऊन
नातं निभावतं,
आणि मग म्हणतात
“आजच्या पिढीला नातं टिकवता येत नाही.”

पण कोणी विचारत नाही
आजची पिढी नातं टिकवू इच्छिते,
पण तिला हात देणारे खांदे कुठे आहेत?

नातं तुटत नाही प्रेमामुळे…

तुटतं तेव्हा शांतता जास्त वाढते आणि संवाद कमी होतो.

नात्यातील अंतर अचानक येत नाही.
ते क्षुल्लक कारणांनी,
लहान दुखांनी,
न बोललेल्या शब्दांनी वाढत जातं.

खरं तर नातं संपतं तेव्हा
कोणी एक म्हणतं,
“मी किती करणार?”

आणि दुसरा गप्प बसतो.

पण जिथे दोघं म्हणतात
“चल, थोडं मी कमी करतो, तू थोडं जास्त कर…”
तिथे नातं फुलायला लागतं

शेवटी सत्य इतकंच 

तुला प्रेमाने नाही, माणसाने दुखावलं आहे.

प्रेम अजूनही सुंदर आहे
त्यात ऊब आहे, शांतता आहे,
आणि खरं सांभाळण्याची ताकद आहे.

चूका लोकांच्या होत्या
त्या लोकांनी प्रेमाचा अर्थच चुकीचा समजला.

एक दिवस नक्की तुला एखादं मन भेटेल
ज्याला तुझं मौनही ऐकू येईल,
ज्याला तुझा भूतकाळ दोष वाटणार नाही,
आणि ज्याच्या सोबत तुझं मन पुन्हा विश्वास ठेवायला शिकेल.

तोपर्यंत…
प्रेमावर रागावू नको.
फक्त स्वतःचं मन जप.
कारण ज्या दिवशी योग्य व्यक्ती भेटेल,
तुझं प्रेम पुन्हा सुंदर दिसेल.

Comments

Popular Posts